कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डिप्रेशन वाढविले; औषधांची विक्रीही वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:47+5:302021-06-24T04:26:47+5:30
सातारा : कोरोनामुळे सामाजिक जीवनाला खीळ बसली आहे. त्यातून लोकांमध्ये नैराश्य, उदासीनता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हे अधिक ...
सातारा : कोरोनामुळे सामाजिक जीवनाला खीळ बसली आहे. त्यातून लोकांमध्ये नैराश्य, उदासीनता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हे अधिक प्रभावीपणे जाणवत आहे. हे डिप्रेशन घालविण्यासाठी अनेकजण मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, औषधोपचार घेत आहेत. डिप्रेशनवरील औषधांची विक्री १० ते १५ टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसत आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणदेखील पहिल्या लाटेच्या तुलनेत वाढले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या माध्यमातून जिल्ह्यात निर्बंध घालण्यात आले. याचा फटका सामाजिक जीवनासह शिक्षण, उद्योग, व्यवसाय, व्यापार, आरोग्य, आदी विविध क्षेत्रांना बसला. आर्थिक, आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे लोकांमध्ये एक अनामिक भीती निर्माण झाली आहे. त्यातून ते डिप्रेशनमध्ये जात आहेत. हे रोखण्यासाठी स्वत:ला मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्याकरिता अनेकजण मानसोपचार तज्ज्ञ, समुदेशकांचा सल्ला, औषधोपचार घेत आहेत. त्यामुळे एकूणच जिल्ह्यात डिप्रेशनबरोबर त्यावरील औषधांची विक्री १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याचे चित्र आहे.
चौकट
डिप्रेशन का वाढले?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधामुळे सामाजिक जीवन काहीसे थांबले असून, एकलकोंडेपणा वाढला आहे. सर्व क्षेत्रात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूच्या प्रमाणामुळे एक दबाव आणि अनामिक भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यातून डिप्रेशन वाढले आहे.
हे टाळण्यासाठी काय कराल?
डिप्रेशन टाळण्यासाठी वास्तव परिस्थिती समजून घेऊन प्रत्येकाने स्वत:ला मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम बनवावे. स्वत:चे एक दैनंदिन वेळापत्रक तयार करावे. त्यामध्ये व्यायाम, योगासने, प्राणायम यासाठी आवर्जून वेळ काढावा. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. एकमेकांशी संवाद साधून आपले मन मोकळे करावे.
प्रतिक्रिया
कोरोनामुळे विविध क्षेत्रात अस्थिर वातावरण निर्माण झाल्याने ताणतणाव वाढून लोकांमध्ये डिप्रेशन वाढत आहे. ते टाळण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यातून ताणतणाव कमी होण्यास मदत होते. हे करूनदेखील डिप्रेशन कमी झाले नाही, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. राजश्री देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ, सातारा
सध्या कोरोनाच्या स्थितीत आर्थिक, आरोग्यविषयक समस्यांमुळे लोकांमध्ये नैराश्य, उदासीनता आणि एकाकीपणा वाढत आहे. असे अवघड कालखंड आयुष्यात येत असतात. आपण सकारात्मक, आशादायी राहणे आणि कुटुंबातील सदस्य, मित्र मंडळीजवळ आपले मन मोकळे करून या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.
- डॉ. हमीद दाभोळकर, मनोविकारतज्ज्ञ, सातारा
चौकट
औषधविक्री १५ टक्क्यांनी वाढली
डिप्रेशन रोखण्यासाठी विविध स्वरूपातील औषधे उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये या औषधांची मागणी खूप नव्हती. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या औषधांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील विक्रीमध्ये १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे, असे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे प्रवीण पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.