माध्यमिक शिक्षक आजही लसीपासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:32+5:302021-03-05T04:39:32+5:30
जावळी तालुक्यात माध्यमिक स्तरावर सुमारे २७० माध्यमिक शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक अंतराच्या सर्व ...
जावळी तालुक्यात माध्यमिक स्तरावर सुमारे २७० माध्यमिक शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक अंतराच्या सर्व निकषांचे पालन करीत त्यांच्याकडून अध्यापनाचे कार्य सुरू आहे. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी व जानेवारीत पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली. शाळा सुरू होतेवेळी प्रत्येक शिक्षकाची कोरोना चाचणीही करण्यात आली. यावेळी झालेल्या चाचणीत काही शिक्षकही बाधित झाले होते. अशातच प्राथमिक शिक्षकांची लसीकरणाकरिता नोंदणी करून त्यांना लसीचा पहिला डोसही दिला गेला. मात्र, यांच्याबरोबरीने माध्यमिक स्तरावर काम करणारे शिक्षक आजही लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.
शासनस्तरावर शाळा सुरू करताना शिक्षकांमध्येच असा दुजाभाव न करता सरसकट सर्वच शिक्षकांना लस देण्याची गरज होती. मात्र तसे घडले नाही. जिल्ह्याचा विचार करता, काही माध्यमिक शाळा, आश्रमशाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थीही कोरोनाग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुरुवारपासून पुन्हा एकदा पाचवी ते नववीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. आता दहावीचे वर्ग सुरू राहणार. माध्यमिक शिक्षकांनाही लवकरच कोरोना लस मिळावी, अशी त्यांचाकडून मागणी होत आहे.
(कोट)
गेल्या अडीच महिन्यांपासून आम्ही विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देत आहोत. वास्तविक पाहता लसीकरण सुरू झाल्यावर लसीकरणाकरिता प्राधान्याने आमचा विचार व्हायला हवा होता. परंतु तसे घडले नाही. यातच आमचे काही सहकारीही कोरोनाग्रस्त झाले आहेत. आजपर्यंत आमची नोंदणीही झाली नाही आणि आम्हाला लसही मिळाली नाही. दहावीच्या वर्गाचे अध्यापन सुरूच राहणार असल्याने आरोग्य विभागाकडून लवकर आम्हाला लस द्यावी, अशी अपेक्षा आहे.
- जयवंत तरडे, मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा