पेरणीपूर्वी बियाणे उगवणक्षमता तपासणे गरजेचे : काशिद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:17+5:302021-06-09T04:48:17+5:30
पिंपोडे बुद्रुक : ‘शेतात पेरणी करतेवेळी वापरले जाणाऱ्या बियाण्यांची पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणे गरजेचे आहे. त्याआधारेच पेरणीसाठी बियाणे किती प्रमाणात ...
पिंपोडे बुद्रुक : ‘शेतात पेरणी करतेवेळी वापरले जाणाऱ्या बियाण्यांची पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणे गरजेचे आहे. त्याआधारेच पेरणीसाठी बियाणे किती प्रमाणात वापरणे याचा अंदाज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक तानाजी काशिद यांनी केले.
बहुतांशी शेतकरी शेतात पेरणीसाठी घरगुती बियाण्यांचा वापर करतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी घरीच बियाण्याची पेरणीपूर्वी उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे पेरणीसाठी वापरले जाणारे बियाणे पेरणी योग्य आहे किंवा त्याची उगवणक्षमता किती आहे यांचा अंदाज करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्यांची घरीच तपासणी करावी तसेच त्यावर बीजप्रक्रिया केल्यास अधिक उपयुक्त ठरते, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक तानाजी काशिद यांनी दिला आहे.
अशी करा तपासणी
बियाण्यातील शंभर दाणे मोजून ते दीड ते दोन सेंटिमीटर अंतरावर दहा ते दहाच्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवा. अशा प्रकारे शंभर दाण्यांचे तीन नमुने तयार करा. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करा व बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी मारा. थंड ठिकाणी ठेवून त्यावर अधूनमधून पुन्हा शिंपडून ओले करावे. सहा-सात दिवसांनी चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करावे. शंभरपैकी सत्तरपेक्षा जास्त दाणे चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे उगवणीच्या गुणवत्तेचे आहे असे समजावे. मात्र ६० टक्केपेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास त्या बियाण्यांची पेरणी करू नये.