कृषी विभागाकडून बीज साक्षरता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:38 AM2021-05-13T04:38:52+5:302021-05-13T04:38:52+5:30

औंध : दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी मंडल कृषी विभागाने बियाणे उगवण क्षमता चाचणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बीज साक्षर करण्याची मोहीम ...

Seed literacy campaign by the Department of Agriculture | कृषी विभागाकडून बीज साक्षरता मोहीम

कृषी विभागाकडून बीज साक्षरता मोहीम

Next

औंध : दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी मंडल कृषी विभागाने बियाणे उगवण क्षमता चाचणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बीज साक्षर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अनेकदा शेतकरी घरातील बियाणे पेरत असतात; मात्र ते बियाणे व्यवस्थित उगवले नाही तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहून आर्थिक नुकसान होते. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागू नये यासाठी खटाव कृषी विभागाच्या वतीने सध्या बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. औंध मंडल विभागातील कार्यक्षेत्रात मंडल कृषी अधिकारी अक्षय सावंत, पर्यवेक्षक मोहन मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक उत्तमराव तिकुटे, आर. एस. ठोंबरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. यामध्ये शेतकऱ्यांनी जर बियाणे जास्त उन्हात वाळवले तसेच बियाणाची साठवण करताना थप्पी लावली तर दाब पडल्याने तळाच्या पोत्यातील बियांचा डोळा खराब होतो. याशिवाय जास्त क्षमतेच्या मशीनने गाळप केले तरी बियाणाची उगवण क्षमता कमी होते. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दाखविलेल्या चाचणीचे प्रात्यक्षिक करून आपल्या घरातील बियाणाची चाचणी करावी, असे आवाहन कृषी साहाय्यक उत्तमराव तिकुटे यांनी केले आहे.

या वेळी बापूसाहेब वाघ, विष्णू वाघ, गणेश बोटे, शशिकांत जाधव, सचिन जाधव, अधिक जाधव, तुळसीदास जाधव, अतुल जाधव, महेश जाधव, तात्यासाहेब जाधव, दिलीप जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

(कोट)

बियाणे व्यवस्थित उगवले नाही तर दुबार पेरणीमुळे पेरणी मशागतीचा खर्च नाहक सोसावा लागतो. परंतु शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता चाचणी समजल्यामुळे बियाणाची खात्री करून घेता येईल. यामुळे दुबार पेरणी करावी लागणार नाही. शेतकऱ्यांना ही पद्धत फायदेशीर ठरेल.

- अक्षय सावंत, मंडल कृषी अधिकारी

फोटो : १२ औंध

औंध येथे शेतकऱ्यांना बीज उगवण प्रात्यक्षिक दाखविताना कृषी साहाय्यक उत्तमराव तिकुटे, आर. एस. ठोंबरे उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)

Web Title: Seed literacy campaign by the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.