गणेशोत्सवात प्रवाशांची गर्दी पाहून ठरतोय ट्रॅव्हल्सचे दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:44 AM2021-09-15T04:44:58+5:302021-09-15T04:44:58+5:30
सातारा : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सतत ब्रेक लागत असलेल्या खासगी प्रवासी वाहतुकीला गणेशोत्सवामुळे चालना मिळाली आहे. हा व्यवसाय ...
सातारा : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सतत ब्रेक लागत असलेल्या खासगी प्रवासी वाहतुकीला गणेशोत्सवामुळे चालना मिळाली आहे. हा व्यवसाय सध्या तेजीत आहे. साताऱ्यातून सर्वाधिक प्रवास मुंबईला होतो. त्यामुळे प्रवाशांची गर्दी पाहून दर निश्चित होत आहे. मोठी गर्दी असल्यावर दर अव्वाच्या सव्वा आकारला जातो, तर गर्दी नसताना प्रवाशांना शोधत काही मुले एसटी बसस्थानकात येत असतात.
सातारा शहरातून जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक गाड्यांची संख्या कोरोना काळात घटली होती. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस परवानगी नाकारल्याने हा व्यवसाय अडचणीत आला होता. बँकेचे हप्ते थांबल्याने शासनाकडून कधी परवानगी मिळणार, याकडे लक्ष लागले होते. आता हा व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सातारा बसस्थानकात खासगी प्रवासी गाडी मालकांचे एजंट मुलं फिरत असतात. प्रवाशांना अडवून पुण्याला.... मुंबईला... असे विचारुन प्रवासी हेरत असतात.
चौकट :
या मार्गावर सर्वाधिक वाहतूक
सातारा-मुंबई
पुसेसावळी-ठाणे
पाटण-मुंबई
सातारा-हैदराबाद
सातारा-बेंगलोर
चौकट :
प्रवाशांच्या शोधात बसस्थानकात
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात रात्री नऊ वाजल्यापासून मध्यरात्री बारा-एक वाजेपर्यंत काही तरुण प्रवाशांना हेरत फिरत असतात. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात येण्यापूर्वीच काहीजण प्रवाशांना अडवून ‘पुण्याला येणार का?’, ‘मुंबईला जायचं का?’ असं विचारत असतात. फलाटावरही जाऊन प्रवाशांच्या कानात हळूच असेच विचारत असतात. पुणे, मुंबईला जाण्यासाठी गाडी नसल्यास या व्यावसायिकांचा दरही वाढत असतो.
चौकट
ढाब्यांवर रांगा
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील अनेक ढाब्यांवर मध्यरात्री जेवणासाठी खासगी गाड्या ओळीत उभ्या असतात. तेथे गेल्यावर हा व्यवसाय किती जोरात सुरू आहे, याची प्रचिती येते.
सुरक्षेची काय हमी...
खासगी प्रवासी गाड्यांमधून अधिकृतपणे पावती घेऊन प्रवास करताना काही दुर्घटना घडल्यास मदत तरी मिळू शकते. मात्र ऐनवेळी त्या गाडीतून प्रवास करताना काही दुर्घटना घडल्यास सुरक्षेची कशी काय हमी मिळणार
- सागर नागुरे, प्रवासी
दिवाळीत एसटीला खूपच मोठी गर्दी असते. दोन-दोन तास तिकीट मिळत नाही. अशावेळी खासगी प्रवासी गाड्यांचा वापर केला तर एकवर चालू शकते. मात्र इतरवेळी एसटीनेच आम्ही प्रवास करण्याला भर देत असतो.
- दत्तात्रय होटकर, सातारा.
दीड वर्षांनंतर चांगले दिवस
कोरोनामुळे दीड वर्षांपासून गाड्या दारात उभ्या होत्या. त्यांच्या देखभालीचा खर्चही निघत नव्हता. गाडी खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यांचेही हप्ते थांबले होते. आता कोठे चांगले दिवस आले आहेत.
- निवृत्ती पोटघन, ट्रॅव्हल्सचालक.
कोरोना काळात कुटुंबातील अनेक सदस्य आजारी पडले होते. त्यावर मोठा खर्च झाला आहे; पण हा व्यवसाय सुरू झाला नव्हता. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. आता तरी थोडाफार खर्च करुन गाडी सुरू केली आहे.
- नरसिंह माने, ट्रॅव्हल्सचालक.