अतिरेक्यांचा खात्मा पाहून जिल्ह्यातील जवान कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू..
By admin | Published: September 30, 2016 01:14 AM2016-09-30T01:14:11+5:302016-09-30T01:26:17+5:30
शहिदांची आठवण अनावर : सैनिकांची सुटी रद्द तरीही कुटुंबीयांना आनंद हल्ल्याचा
सातारा : काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात जोरदार वातावरण निर्माण झाले होते. पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी होत होती. अखेर भारतीय सैन्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन जोरदार हल्ला करून ३५ च्यावर दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईचे स्वागत सर्वत्रच होत असताना सातारा जिल्ह्यातील शहिदांच्या गावांमध्येही रोमांच उठले आहेत.
पाकिस्तानकडून भारतात नेहमीच आगळीक होत आहे. दहशतवादी भारतात घुसविणे, पाक सैन्याकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन होणे अशा घटना वारंवार घडत आहेत. सुमारे एक वर्षापूर्वी कुपवाडा येथील हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्यानंतर नुकताच पठाणकोट येथे हल्ला झाला होता. पाकिस्तानवर कारवाई करा, अशी जोरदार मागणी होत होती. पठाणकोटचा हल्ला विसरतो ना विसरतो तोच जम्मू काश्मीरमधील उरी येथील सैन्याच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला.
दहा दिवसांपूर्वीच्या या घटनेत १८ जवान शहीद झाले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जाशी, ता. माण येथील चंद्रकांत गलंडे हे शहीद झाले होते. तसेच महाराष्ट्रातील काही जवानांनाही वीरमरण आले होते. उरी येथील हल्ल्यानंतर तर सर्वत्र पाकिस्तानच्या विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. भारताने आता तरी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला ‘मुँह तोड जवाब’ द्यावा, अशी सर्वच स्तराबरोबरच शहीद जवानांच्या कुटुंबीयांकडूनही मागणी होत होती. अखेर गुरुवारी पहाटेच्या सुमारास भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या छावणीवर हल्ला केला. या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे भारतीय नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभराच्या काळात सातारा जिल्ह्यातील काहींना वीरमरण आले आहे. त्यामध्ये कर्नल संतोष महाडिक, चंद्रकांत गलंडे आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पाकिस्तानला धडा शिकविला त्याचे समाधान
लष्करातील अनेक सैनिक दसरा सणानिमित्त सातारा जिल्ह्णातील आपल्या गावाकडे येणार होते. त्यासाठी त्यांनी अगोदरच सुटीही काढली होती. मात्र, गुरुवारच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे सीमेवरील जवानांची सुटी अकस्मातपणे रद्द करण्यात आल्याने कुणीही गावी येऊ शकणार नाही. असे असले तरी वारंवार आगळीक करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविला जात आहे, याचा आनंद जवानांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही आहे.
भारताला सतत त्रास देणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा असाच करायचा असतो. ज्या पद्धतीने देशाने धाडस दाखविले आहे. त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. याक्षणी आम्हाला शहीद बंधू संतोष यांची खूप आठवण येते.
- जयवंत घोरपडे,
शहीद संतोष महाडिक यांचे बंधू,
भारताने पाकिस्तानविरोधात उचलेलं पाऊल नक्कीच अभिमानास्पद असून, आम्हाला समाधान वाटत आहे. सरकारने अशीच कारवाई त्या-त्यावेळी विनाविलंब करावी. जेणेकरून उरीसारखा हल्ला करण्यास पाकिस्तान पुन्हा धजावणार नाही.
- केशव गलंडे, लान्स हवालदार
शहीद चंद्र्रकांत गलंडे यांचे भाऊ