कही पे निगाहे... कही पे निशाना !
By admin | Published: September 5, 2014 09:25 PM2014-09-05T21:25:25+5:302014-09-05T23:22:10+5:30
भाजपला एक‘नाथ’ भेटणार का ?
कऱ्हाड : ‘पुस्तक’ माणसाचं ‘मस्तक’ सुधारतं असं म्हणतात; पण सुधारलेल्या मस्तकाची माणसं असणाऱ्या भाजपनं चक्क मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाड दक्षिणेतील पुस्तक चळवळीवरच लक्ष केंद्रीत केलय. मतदारसंघातील ७३ ग्रंथालयांना सुमारे २२ लाखांचा निधी भाजपने दिलाय. वाचन संस्कृती विस्तारासाठी भाजपचा हा चांगला प्रयत्न असला तरी आगामी विधानसभा आणी ‘पृथ्वीराजबाबा’ हेच त्यापाठीमागचे खरे ‘लक्ष्य’ असल्याचे मानले जाते.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कऱ्हाड दक्षिणेत सध्या ‘छप्पर फाडके’ निधीची बरसात सुरू आहे़ रस्ते, सभामंडप, बंदिस्त गटार आदिंसाठी निधीवर निधी पडत असताना, दक्षिणेत कमळ फुलवू पाहणाऱ्या भरत पाटलांनी पक्षाच्या आमदार शोभा फडणवीस यांच्याकडे पाठपूरावा करून जिल्ह्यातील ८३ ग्रंथालयांसाठी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे़ त्यात एकट्या कऱ्हाड दक्षिणेतील ७३ ग्रंथालयांचा समावेश आहे, हे विशेष ! दक्षिणेत सध्या तीन आमदार आहेत़ त्यापैकी एक पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराजबाबा हे राज्याचे मुख्यमंत्री असुन विलासराव पाटील-उंडाळकर व आनंदराव पाटील आपल्या आमदार फंडातून लाखांचा निधी देत असतानाच मुख्यमंत्री चव्हाणांच्या निधीने मात्र कोटींची उड्डाणे घेतली आहेत़ पृथ्वीराज चव्हाणांना निवडणुकीत होम पिचवरच खिळवून ठेवण्याची व्यूहरचना साहजीकच भाजप आखत आहे़ दक्षिणेतून तगडा उमेदवार देण्याबाबत त्यांच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाले नाही तरी आपल्या उमेदवाराने चांगली झुंज द्यावी म्हणून स्वत: विनोद तावडेंनी लक्ष घातलय म्हणे. म्हणून तर या निधीसाठी ८३ पैकी ७३ ग्रंथालय एकट्या कऱ्हाड दक्षिणमधील निवडल्याचे मानले जाते़
साधारणपणे निधीचे वाटप करताना गट-तट, पार्टी-पक्ष याचा विचार होतो़ पण कमकुवत असणारा दक्षिणेतील भाजप मजबूत करण्यासाठी तसा विचार केलेला दिसत नाही़ मात्र भाजपने ग्रंथालय निधीच्या माध्यमातून पेरलेले ‘शब्दांचे बीज’ निवडणुकीत किती उगवणार हे काळचं ठरवेल़ सध्यातरी या निधीची चर्चा सुरू आहे़ (प्रतिनिधी)
भाजपला एक‘नाथ’ भेटणार का ?
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा कऱ्हाडला दोनवेळा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पहिल्यांदा मेळावा आयोजित केला त्यावेळी पदाधिकारी तयारीलाही लागले होते. मात्र, अचानकपणे तो मेळावा रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्यांदा मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा पदाधिकाऱ्यांचा मानस होता. मात्र, दुसऱ्यांदा नियोजित मेळावाही रद्द झाला आहे़ त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सूर असून दक्षिणच्या भाजपला एक‘नाथ’ भेटणार का ? आणि भेटणार असेल तर तो कधी भेटणार ? याबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे़