मयूर पवारची आॅलिम्पिकमधील सायकलिंग सरावासाठी निवड
By admin | Published: July 1, 2017 01:04 PM2017-07-01T13:04:31+5:302017-07-01T13:04:31+5:30
भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा मानस
आॅनलाईन लोकमत
मेढा (सातारा) , दि. 0१ : गवडी, ता. जावळी येथील मयूर शशिकांत पवार याची २०२० साली जपान येथे होणाऱ्या आॅलिम्पिक स्पधेर्तील सायकलिंग खेळाच्या सरावासाठी निवड करण्यात आली आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, आॅलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचणारा मयूर पवार हा जावळी तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला आहे. खेळाच्या सरावासाठी स्पोर्ट अॅथॉरिटी इंडिया (साई) या संस्थेकडून ही निवड करण्यात आली आहे.
जावळी तालुका हा दुर्गम डोंगराळ असला तरीही येथील अनेक व्यक्तींनी आपल्या कायार्चा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रात जावळीचे नाव अभिमानाने घेतले जाते. खडतर परिस्थितीवर मात करून आपला ठसा उमटवण्याचे एक वेगळे वैशिष्ट्य जावळीकरांचे आहे. या वैशिष्ट्याला साजेसा प्रयत्न मयूर पवार याने केला आहे.
मयूर पवार सहा वर्षांच्या असताना त्याचे पितृछत्र हरवले. त्यानंतर आईने कष्ट करून मयुरचे शिक्षण पूर्ण केले. मयूरच्या अंगी असलेल्या खेळाडूला त्याचे शिक्षक प्रभाकर धनवडे यांनी प्रोत्साहन दिले. खो-खो, धावण्याच्या स्पर्धेत तालुका जिल्हा व राज्य स्तरावर बक्षिसे मिळवली. यानंतर मयूर याची क्रीडा प्रबोधिनी, मिरज येथे निवड झाल्यानंतर एक वर्ष धावण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याची बालेवाडी, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत निवड झाली. येथे मयूरने मेहनत घेवून सायकलिंग खेळाला महत्त्व देत त्यात प्राविण्य मिळवले. रांची (झारखंड) येथील नॅशनल स्पर्धेत मयूर सहभागी झाला.
मयूर पवार याने कर्नाटक राज्यात २०१५ मध्ये झालेल्या नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक, केरळ व लुधियाना येथे झालेल्या स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कांस्य पदक मिळवले होते. २०१६ साली तिरुअनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मयूरने एक सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य पदक मिळवली होती. त्याची ही कामगिरी बघून स्पोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) या नॅशनल सायकलिंग टीम अकॅडमी या संस्थेमार्फत निवड झाली. २०१७ मध्ये मयूर याची दिल्ली येथील ट्रॅक एशियन सायकलिंग या आंतरराष्ट्रीय स्पधेर्साठी निवड झाली. या स्पर्धेत १५ देश सहभागी झाले होते.
मयूरची जिद्द व चिकाटी पाहिल्यावर जपान येथे २०२० साली होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवेल, असा विश्वास मयुरची आई सीमा पवार यांनी व्यक्त केला आहे.
या यशाबद्दल जावळी पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिर्के यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य, अधिकारी वर्ग, मयूरची आई सीमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.