सातारा जिल्ह्यातील जनता बँक, मायणी अर्बनसह १५ संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार
By नितीन काळेल | Published: May 11, 2023 11:51 AM2023-05-11T11:51:17+5:302023-05-11T11:51:30+5:30
बाजार समिती निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय तोपर्यंतच आता १५ संस्थांची निवडणूक होणार
सातारा : जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय तोपर्यंतच आता १५ संस्थांची निवडणूक होणार आहे. यातील बहुतांशी संस्थांची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पण, एखाद्या-दुसऱ्या संस्थेची निवडणूक लागली तरी चांगलाच धुरळा उडणार आहे. या संस्थांत साताऱ्यातील जनता बँक, खटावमधील मायणी अर्बन, कऱ्हाडच्या पी. डी. पाटील बँकेचा समावेश आहे, तर यासाठी अर्ज स्वीकृतीस सुरुवातही झाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका पुढे गेल्याने राजकीय वातावरण थंड आहे. पण, काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्ह्यातील ९ बाजार समिती निवडणुकीमुळे राजकीय धुरळा चांगलाच उडाला होता. आरोप-प्रत्यारोप झाले. विरोधकांनीही हातात हात घातल्याचे दिसले. ही राजकीय लढाई होती. पण, आता सहकारातील लढाईही पाहायला मिळणार आहे. कारण, जिल्ह्यातील १५ सहकारी संस्थांची निवडणूक सुरू झालेली आहे. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बँकांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित संस्थेची निवडणूक बिनविरोध न झाल्यास पुन्हा एकदा धुरळा उडणार हे निश्चित आहे.
सातारा शहराची अर्थवाहिनी म्हणून जनता सहकारी बँकेकडे पाहिले जाते. या बँकेची निवडणूकही जाहीर झाली आहे. ११ मेपासून अर्ज विक्री व स्वीकृती सुरू होणार आहे. दि. १७ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर निवडणूक बिनविरोध न झाल्यास दि. १७ जूनला मतदान होऊन दि. १८ ला मतमोजणी होणार आहे. खटाव तालुक्यातील दि मायणी अर्बन को-ऑप बँकेचीही निवडणूक होत आहे. या बँकेच्याही शाखा आहेत. त्यामुळे येथेही निवडणूक होणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. या बँकेसाठी १० मेपासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली आहे, तर निवडणूक झाल्यास ११ जूनला मतदान होणार आहे.
कऱ्हाडमधील पी. डी. पाटील सहकारी बँकेवर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व आहे. आता या बँकेचीही निवडणूक सुरू झाली आहे. बुधवारपासूनच अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे, तर या बँकेसाठी ११ जूनला मतदान होणार आहे, तर १२ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील या मोठ्या बँकांबरोबरच अनेक संस्थांचीही निवडणूक होत आहे. यामध्ये साताऱ्यातील रयत सेवक को-ऑप. स्टोअर्स, ग्राहक संघ सेवक सहकारी पतसंस्था सातारा, सातारा तालुका औद्योगिक बहुद्देशीय ग्रामोद्योग सहकारी संस्था. खटाव तालुक्यातील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्थेचीही निवडणूक होत आहे. त्याचबरोबर माण तालुक्यातील कुकुडवाडच्या श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था, कऱ्हाडमधील कराड जनता सहकारी होलसेल कन्झ्युमर्स सोसायटी, कृष्णा सरिता महिला घाऊक व किरकोळ सहकारी संस्था, शिवाजी माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्था तसेच कऱ्हाड तालुक्यातीलच वाठारच्या शिवतेज मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था आणि कृष्णा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेची निवडणूक होत आहे. कऱ्हाडमधीलच अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयीन सहकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचीही निवडणूक जाहीर झाली आहे.
कऱ्हाडमधील आठ संस्थांची निवडणूक...
जिल्ह्यातील सहकारामधील १५ संस्थांची निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक आठ संस्था या कऱ्हाड तालुक्यातील आहेत, तर यानंतर सातारा तालुक्याचा क्रमांक लागतो. साताऱ्यातील चार, खटावमधील दोन आणि माण तालुक्यातील एका संस्थेची निवडणूक होत आहे. यासाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.