पुणे मेट्रोचे स्टेअरिंग साताऱ्याच्या कन्येच्या हाती!, अपूर्वा अलटकरची लोको पायलट म्हणून निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 11:41 AM2023-08-03T11:41:40+5:302023-08-03T11:44:00+5:30

कोरोना काळात तिला नोकरी गमवावी लागली

Selection of Apoorva Alatkar of Satara as Loco Pilot, First woman loco pilot of Pune Metro | पुणे मेट्रोचे स्टेअरिंग साताऱ्याच्या कन्येच्या हाती!, अपूर्वा अलटकरची लोको पायलट म्हणून निवड

पुणे मेट्रोचे स्टेअरिंग साताऱ्याच्या कन्येच्या हाती!, अपूर्वा अलटकरची लोको पायलट म्हणून निवड

googlenewsNext

सातारा : आपल्या मुलीने अधिकारी, डॉक्टर, वकील व्हावं ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. काही मुली कठोर परिश्रमाने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करतात तर काही मुली करिअरची वेगळी वाट शोधतात. साताऱ्यात राहणाऱ्या अपूर्वा प्रमोद अलटकर (वय २८) या तरुणीनेदेखील करिअरचं वेगळं अन् तितकंच धाडसी क्षेत्र निवडलं असून, पुणे मेट्रोची पहिली महिला ‘लोको पायलट’ बनण्याचा बहुमानही तिने पटकावला.

अपूर्वाचे वडील खासगी कंपनीत नोकरीला असून, आई संसाराचा गाडा चालवते. अपूर्वाला दोन भावंड आहेत. तिचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यातील बापूसाहेब चिपळूणकर प्रशालेत पूर्ण झाले. यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने सोलापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. यानंतर साताऱ्यातील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये तिने बी. ई. मेकॅनिकलची पदवी घेतली.

शिक्षण घेत असताना अपूर्वाने स्पर्धा परीक्षेची तयारीदेखील सुरू ठेवली होती. या परीक्षेत यश तिला हुलकावणी देत होते. शिक्षण घेऊन पुण्यातील एका खासगी कंपनीत अपूर्वाने दोन वर्षे नोकरी केली. मात्र, कोरोना काळात तिला ही नोकरी गमवावी लागली. याचवेळी पुणे मेट्रोत टीसी, लोको पायलट, कंट्रोलर आदी पदांसाठी भरती निघाली. अपूर्वाने या पदांसाठी अर्ज केला, परीक्षा दिली अन् ती उत्तीर्णही झाली. तिची पुणे मेट्रोत पहिली महिला लोको पायलट म्हणून २४ फेब्रुवारीला निवड करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अपूर्वाने मंगळवारी (दि. १) रुबी हॉल क्लिनिक ते वनाज स्टेशन मेट्रोचे स्वत: सारथ्य केले.

वाहन परवाना आला कामी...

अपूर्वाला सतत काहीतरी नवीन करण्याची, शिकण्याची लहानपणापासूनच आवड आहे. त्यामुळेच तिने शिक्षण घेत असताना चारचाकीचे प्रशिक्षण घेऊन वाहन परवाना मिळवला. लोको पायलटपदी निवड होताना तिला तिचा हा अनुभव व परवाना दोन्हीही कामी आले, अशी माहिती अपूर्वाचे वडील प्रमोद अलटकर यांनी दिली.

कोणतंही यश झटपट मिळत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. लोको पायलट म्हणून काम करणं ही माझ्यासाठी खरोखरंच आनंददायी बाब आहे. आज महिला विमान चालवू शकतात तर मेट्रो का नाही? या कामाचा अनुभव रोमांचकारी आहे. तरुणींनीदेखील करिअरच्या वेगळ्या वाटा शोधायला हव्यात. त्यांना यश नक्कीच मिळेल, असे मला वाटते. - अपूर्वा अलटकर, लोको पायलट

Web Title: Selection of Apoorva Alatkar of Satara as Loco Pilot, First woman loco pilot of Pune Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.