सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी अन् बनवडीचा ग्रामस्वच्छता अभियानात डंका
By नितीन काळेल | Published: February 26, 2024 06:44 PM2024-02-26T18:44:53+5:302024-02-26T18:46:57+5:30
सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखली
सातारा : सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखली असून आता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि कऱ्हाडमधील बनवडीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यस्तरावरील डंका कायम राहिला आहे. तर या गावांचा पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ मार्च रोजी होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेने मागील २० वर्षांपासून शासनाच्या विविध योजना, उपक्रमांत दबदबा निर्माण केलेला आहे. ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राममध्येही सातत्याने यश मिळवले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यस्तर तसेच दिल्लीतही गाैरव झाला आहे. आताही सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखत याहीवर्षी राज्यात पुरस्कार पटकावला आहे.
तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९, २०१९-२० तसेच २०२०-२१ आणि २०२१-२२ (एकत्रित एक स्पर्धा) या वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय पुरस्कार प्राप्त ठरलेल्या ग्रामपंचायती व विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा ५ मार्च रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. तसेच दि.१ मार्च रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागात प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील बनवडी आणि मान्याचीवाडी ग्रामपंचायतींचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील कामाबद्दल गौरव होत आहे. हा ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकत्रित स्वच्छतेतील सातत्यपूर्ण कामगिरीचा परिपाक आहे. सर्वांचे जिल्हा परिषदेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबरच या गावांकडून जिल्ह्यातील इतर गावांनी प्रेरणा घेऊन यश मिळवावे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी