हलाखीची परिस्थिती, एका खोलीत संपुर्ण कुटूंब; चरेगावच्या शिवम विसापुरेची पोलिस उपअधीक्षकपदी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:30 PM2023-05-29T16:30:41+5:302023-05-29T16:32:13+5:30

स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात शिवम नायब तहसीलदार बनला

Selection of Shivam Visapure from Charegaon in Karad taluka as Deputy Superintendent of Police | हलाखीची परिस्थिती, एका खोलीत संपुर्ण कुटूंब; चरेगावच्या शिवम विसापुरेची पोलिस उपअधीक्षकपदी झेप

हलाखीची परिस्थिती, एका खोलीत संपुर्ण कुटूंब; चरेगावच्या शिवम विसापुरेची पोलिस उपअधीक्षकपदी झेप

googlenewsNext

अजय जाधव

उंब्रज: फिनिक्स भरारी हा शब्द प्रयोग आपण नेहमी वाचतो, ऐकतो. पण हा फिनिक्स भरारी शब्द तंतोतंत लागू होतो तो कराड तालुक्यातील चरेगाव येथील २६ वर्षीय शिवम विसापूरे याने मिळवलेला पोलिस उपअधीक्षक या पदाच्या निवडीच्या यशोगाथेतूनच.

कराड तालुक्यातील चरेगाव येथील विसापूरे हे कुटूंबाला एक गुंठा ही शेतजमीन नाही. हे कुटूंब ज्या घरात राहत होते, ते घर म्हणजे बाहेरच्या खोलीत चटणी करायचा डंक व आतील एका खोलीत संपूर्ण कुटूंब. अशी हलाखीची परिस्थिती असताना ही कुटूंबाची आर्थिक प्रगती होण्यासाठी शिवम विसापुरे याची आई छाया विसापुरे या आशा सेविका म्हणून काम करायच्या. तसेच शाळेत पोषण आहार देखील तयार करत. वडिल दत्तात्रय विसापूरे यांनी तासवडे एम.आय.डी.सी मध्ये नोकरी केली. काही काळ त्यांची नोकरी ही गेली. त्यावेळी आईने संपूर्ण संसाराची जबाबदारी खांद्यावर घेत संसाराचा रथ ओढला.

प्रामाणिक प्रयत्न व जोडीला कष्ट असले तर दिवस बदलतात. हे डोक्यात ठेऊन या कुटूंबाने आर्थिक प्रगती केली. शिवम हुशार व जिद्दी होता. यामुळे विसापुरे दांपत्याने ठरवले की, काहीही झाले तरी शिवमला शासकीय अधिकारी बनवायचेच. लहान भाऊ अक्षयने वडिलांना व्यवसायात साथ देऊन मोठा भाऊ शिवमला यश मिळवण्यासाठी मदत केली. याच दरम्यान, शिवमचे लग्न केले. पत्नी पुजानेही शिवमला सहकार्य केले. पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात २५ व्या वर्षी शिवम नायब तहसीलदार बनला. तिसऱ्या प्रयत्नात २६ व्या वर्षी पोलीस उपअधीक्षक झाला.

शिवमने प्राथमिक शिक्षण चरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल मध्ये घेतले. मँकेनिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाची पदविका कराडच्या शासकीय कॉलेज मधून घेतली. पुणे येथील कॉलेज मधून मँकेनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे.

ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत 

चरेगाव येथील सर्वसामान्य कुटूंबातील शिवमने मिळवलेल्या यशाचा आनंद विसापुरे कुटूंबाला झालाच. पण आपल्या चरेगावचे नाव शिवमने रोशन केले. याचा आनंद चरेगाव ग्रामस्थांना ही झाला. शिवम गावात आल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले.वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली. कोणी त्याला घोड्यावर बसवले. कोणी ओपन जीप मध्ये बसवले. तर मित्रांनी खांद्यावर बसवून शिवमची गावातून मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.
 


घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना ही आई,वडील यांनी कष्ट करून मला शिकवले. लहान भावाने वडिलांना व्यवसायात मदत केल्याने मला अडचण आली नाही. आई-वडिलांचे कष्ट मी विसरू शकत नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे हे मी ठरवले अन् जिद्दीने ते पूर्ण केले. - शिवम दत्तात्रय विसापुरे

Web Title: Selection of Shivam Visapure from Charegaon in Karad taluka as Deputy Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.