डोक्यात नशा अन् डोळ्यात सेल्फी ! !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:37 PM2017-08-03T23:37:41+5:302017-08-03T23:37:45+5:30
हणमंत यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चाफळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कावळे साद पॉर्इंटवर दारूच्या नशेत खोल दरीत कोसळणाºया दोन तरुणांचा व्हिडिओ एकीकडे व्हायरल झालेला असताना दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळी अशा दुर्घटनेची पुनरावृती होऊ शकते, अशी भीती जिल्ह्यातून अनेकांनी व्यक्त केली आहे.
सडावाघापूर, ता. पाटण येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वाहतुकीची चांगली सोय असल्याने येथे येणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, हुल्लडबाजी करणाºयांची संख्याही येथे लक्षणीय असते. त्यातच या उलट्या धबधब्यावर सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. या मोहापायी ते स्वत:चा जीव अक्षरश: धोक्यात घालतात.
चाफळच्या पश्चिमेस उंच डोंगर पठारावर सडावाघापूर हे गाव वसले आहे. या गावापासून काही अंतरावर सध्या पर्यटकांना खुणावणारा उलटा धबधबा हे ठिकाण आहे. उंब्रज ते चाफळ मार्गे दाढोली या रस्त्यावरूनही या ठिकाणाकडे जाण्यास पक्क्या स्वरुपाचा डांबरी रस्ता आहे. कास, ठोसेघर, कोयनेपाठोपाठ हा उलटा धबधबा निसर्गप्रेमींचे मुख्य आकर्षण ठरू लागला आहे. हिरवाईने फुललेला हा परिसर अल्पावधीतच पर्यटकांना खुणावू लागला आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
सध्या या पर्यटनस्थळास हुल्लडबाज तरुणांचे ग्रहण लागले आहे. दारूच्या नशेत गाडीतील गाण्यांवर ही तरुणाई सैराट होताना दिसून येत आहे. बºयाचदा मद्यधुंद अवस्थेत जीव धोक्यात घालून कड्याजवळ धोकादायक परिस्थितीत ही मंडळी चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्या डोक्यावर घेऊन नाचताना आढळून येत आहेत.
ना कुणाची भीती ना कुणाचा अटकाव.
त्यामुळे येथे हुल्लडबाज पर्यटकांच्या दंगामस्तीत वाढच होत आहे. याचा त्रास महिला पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ट्रिपल सीट फिरणे, बेभान होऊन गाड्या चालवणे अशा प्रकारात वाढ झाली आहे.