स्वाभिमान दिन उत्साहात; अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेने अनुभवला शिवकाल!
By सचिन काकडे | Published: January 12, 2024 07:25 PM2024-01-12T19:25:58+5:302024-01-12T19:26:33+5:30
स्वाभिमान दिन उत्साहात साजरा : छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
सातारा : जय भवानी.. जय शिवाजी असा जयघोष, हलगीचा कडकडाट अन् तुतारीच्या निनादात किल्ले अजिंक्यताऱ्यावर शुक्रवारी छत्रपती शाहू महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन तथा सातारा स्वाभिमान दिन मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो शिवभक्तांनी या सोहळ्याला हजेरी लावल्याने अजिंक्यताऱ्यावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली.
छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची ज्वलंत राजधानी म्हणून साताऱ्याची देशभर ओळख आहे. युगनिर्मात्या शिवरायांचे नातू व धर्मवीर संभाजीराजेंचे पूत्र छत्रपती शाहू महाराज यांचा १२ जानेवारी १७०८ रोजी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर राज्यभिषेक झाला होता. या विलक्षण घटनेला यंदा ३१६ वर्षे पूर्ण होत असून, सातारा शहराच्या संस्थापकांचा स्मरणदिन व सातारा स्वाभिमान दिन किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर मोठ्या दिमाखात पार पडला.
स्वाभिमान दिनानिमित्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेची शुक्रवारी सकाळी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंगळाई देवीपर्यंत पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवतांचे दर्शन घेऊन पालखी सोहळा राजसदरेवर विसावला. यावेळी शिवभक्तांनी दिलेल्या गगणभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. भगवे फेटे अन् भगव्या पोशाखातील मावळ्यांमुळे किल्ल्यावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली. राजमाता जिजाऊ यांचीदेखील जयंती असल्याने उपस्थित महिला भगिनींनी छत्रपती शाहू महाराजांच्या पालखीला खांदा दिला. पालखीचा मान मुस्लिम बांधवांनादेखील देण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, प्रशांत आहेरराव, कन्हैय्यालाल राजपुरोहित, दत्ताजी भोसले, अमर जाधव, डॉ. संदीप मंहिद, अजय जाधवराव, रेणू येळगावकर, शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.