स्वखर्चातून झाडे लावून पर्यावरण रक्षणाची साद!
By admin | Published: January 16, 2017 06:22 PM2017-01-16T18:22:20+5:302017-01-16T18:22:20+5:30
समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील सात तरुणांनी एकत्र येऊन रोड रेंजर्स या संस्थेच्या माध्यमातून
आॅनलाईन लोकमत
शिरवळ (सातारा),दि. 16 - समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील सात तरुणांनी एकत्र येऊन रोड रेंजर्स या संस्थेच्या माध्यमातून मुंबई ते गोवा असा सायकलवर प्रवास सुरू केला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर झाडे लावा-झाडे जगवा हा संदेश देत महामार्गालगतच्या गावामध्ये स्वखर्चातून वृक्षारोपण करत गावकऱ्यांना पर्यावरण रक्षणाची साद घालत आहेत.
आधुनिक युगात तरुणाई सोशल मीडिया अन् इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चालली आहे. त्यांच्यातील ध्येय नाहीसे होत चालले असल्याचीही ओरड एकीकडे होत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. समाजात मात्र काही तरुण हे इतके समाजाप्रती ध्येयवेडे असतात की, ते समाजासाठी काहीतरी वेगळे करून दाखविण्यासाठी धडपडत असतात.
मुंबई सेंट्रल येथील रोड रेंजर्स संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन प्रशांत मगदूम, रोहित धारक, रामचंद्र मोरया, अंकित वाघरे, सिद्धेश कांबळी, सागर कांबळी, चेतन पावडे या सात तरुणांनी समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मुंबई-गोवा या मार्गाची निवड केली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणामुळे या महामार्गावर वृक्षांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचे या तरुणांच्या निदर्शनास आले. यामुळे या गोष्टीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सात तरुणांनी पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या गावागावांमध्ये स्वखर्चातून महामार्गालगत वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला.
ह्यरोड रेंजर्सह्णच्या माध्यमातून मुंबई-गोवा असा सायकलवर प्रवास करत आहे. दरम्यान, संबंधित तरुणांकडून महामार्गावरील गावागावांमध्ये वृक्षारोपण करत ह्यझाडे लावा-झाडे जगवाह्णचा संदेश देत पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यापूर्वीही तरुणांनी मुंबई ते अलिबाग अशी सायकलस्वारी काढत पर्यावरणाबाबत जनजागृती केली आहे.
हे सर्व तरुण शिरवळ येथे आले असता शिरवळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा उपसरपंच उदय कबुले, सामाजिक कार्यकर्ते दिनेश भरगुडे, माजी उपसरपंच आदेश भापकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिरवळ ग्रामपंचायत सदस्य विजय पवार, शिवप्रेरणा पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद ननावरे, शिंदेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मोहन सोनावणे, स्वप्नील जाधव, ललित खोपडे, पराग वाघ, अविनाश मगर, काका राऊत, वासुदेव भरगुडे, शिवराज भरगुडे, विशाल बडदे, नीलेश खरमरे, सुहित जाधव, चेतन जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)