निस्वार्थ मैत्रीतून शाश्वत समाजकार्य व्हावे : दीपक माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:39 AM2021-07-28T04:39:57+5:302021-07-28T04:39:57+5:30
नागठाणे : ‘निस्वार्थ मैत्रीच्या माध्यमातून शाश्वत समाजकार्य करणे गरजेचे आहे, असे उद्गार अंनिसचे सातारा जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष डाॅ. दीपक ...
नागठाणे : ‘निस्वार्थ मैत्रीच्या माध्यमातून शाश्वत समाजकार्य करणे गरजेचे आहे, असे उद्गार अंनिसचे सातारा जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष डाॅ. दीपक माने यांनी काढले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्ट्स ॲण्ड काॅमर्स काॅलेज, नागठाणे येथे विवेक वाहिनी समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
डॉ. माने पुढे म्हणाले, ‘मैत्रीचे नाते वृध्दिंगत होण्यासाठी त्यामध्ये निखळ व नि:स्वार्थ प्रेम, आदर, विश्वास व सहवास असणे गरजेचे आहे. अनेक संत महात्म्यांपासून ते थोर महापुरुषांनी विश्वासार्ह मैत्रीच्या माध्यमातून यशाची शिखरे पार केली.
वंदना माने म्हणाल्या, ‘मैत्री ही जाती, धर्म, पंथ या भेदापलीकडे असणे गरजेचे आहे. मानवता हाच धर्म जोपासला तर समाजाचा सर्वांगिण विकास होणे शक्य आहे. तसेच मैत्री ही व्यसनांपासून दूर ठेवणारी व संकटकाळी मदतीला धावून येणारी असावी.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळख विवेक वाहिनी समितीचे प्रमुख प्रा. गणेश गभाले यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. एस. के. आतार यांनी केले. प्रा. बालाजी शिनगारे यांनी आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन सहभाग नोंदविला.