विट्यात कामोत्तेजक गोळ्यांची विक्री
By Admin | Published: February 4, 2016 01:04 AM2016-02-04T01:04:36+5:302016-02-04T01:10:34+5:30
म्हसवडच्या तरुणावर गुन्हा
विटा : बेकायदेशीररित्या कामोत्तेजक गोळ्या विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाने विटा येथे छापा टाकून अभिजित चंद्रकांत शेटे (वय १९, रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) या तरुणावर बुधवारी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पथकाने तरुणाकडून सुमारे २२ हजार ४० रुपयांचा बेकायदेशीर गोळ्यांचा साठा जप्त केला.
म्हसवड येथील अभिजित शेटे हा तरुण विटा येथे दर आठवड्याला येऊन कामोत्तेजक गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करीत असल्याची माहिती सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. यानंतर औषध निरीक्षक सुहास सावंत यांच्यासह पथकाने बुधवारी सकाळी विट्यातील सराफ पेठेजवळ पॉवर हाऊस रस्त्यावर छापा टाकला. त्यावेळी शेटेकडे सुमारे २२ हजार ४० रुपयांच्या कामोत्तेजक गोळ्यांचा साठा सापडला. या तरुणाला पथकाने ताब्यात घेतले. (वार्ताहर)