आध्यात्माची सांगड घालत स्वच्छतेचा संदेश!

By admin | Published: March 19, 2015 08:48 PM2015-03-19T20:48:07+5:302015-03-19T23:53:02+5:30

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान : ८५७ सदस्यांकडून संभाजीनगर, कुडाळ, वेळे, अभेपुरी, पाटणमध्ये मोहीम

Send a message of cleanliness to the spirituality! | आध्यात्माची सांगड घालत स्वच्छतेचा संदेश!

आध्यात्माची सांगड घालत स्वच्छतेचा संदेश!

Next

सातारा : आध्यात्माची सांगड घालत सामाजिक एकतेचा संदेश देत सामाजिक जाणिवेतून कार्य करणाऱ्या डॉ़ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, अलिबाग) च्या वतीने रविवारी (दि़ १५) जिल्ह्यातील चार मोठ्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ८५७ श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून ४६ टन कचरा गोळा केला़ ज्येष्ठ निरुपणकार व केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दूत डॉ़ आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे़अध्यात्माबरोबरच विज्ञानाची कास धरत सदृढ समाज मन घडविण्याचे कार्य डॉ़ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून करत आहे़ सामाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरा दूर करण्याबरोबरच व्यसनमुक्तीचे कार्यही प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे़ रक्तदान, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप, अपंगांना साहित्य वाटप, प्रौढ शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, पर्यावरण पूरक उपक्रमे राबविणे, यासह इतरही समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात़ डॉ़ धर्माधिकारी प्रतिष्ठानने यापूर्वीच स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे़ याच सामाजिक कार्याची दखल घेत शासनाने डॉ़ आप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छतादूत पदी नियुक्ती केली़ डॉ़ धर्माधिकारी प्रतिष्ठानने यापूर्वी देशासह संपूर्ण राज्यात एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवून विश्वविक्रम केला आहे़ या अभियानात लाखो श्री सदस्य सहभागी झाले होते़
सातारा जिल्ह्यात यापूर्वीच डॉ़ नानासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान सुरू आहे़ टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान सुरू आहे़ रविवारी (दि़ १५) संभाजीनगर ग्रा़ पं़ (ता़ सातारा), अभेपुरी ग्रा़ पं़ (ता़ वाई) वेळे ग्रा़ पं़ (ता़ वाई), कुडाळ ग्रा़ पं़ (ता़ जावली) व पाटण ग्रामपंचायत या गावांत ८५७ श्री सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले़ सकाळी सात वाजता गावागावातील मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली़ सदस्यांनी गावातील प्रमुख मार्ग, चौक व गल्ली-बोळातही स्वच्छता मोहीम राबवून ४८ टन कचरा गोळा केला़ श्री सदस्यांचे एकाच वेळी शेकडो हात राबत असल्यामुळे कचऱ्याचे ढिग अल्पावधीत कमी होत होते़ कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे़ स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्या सदस्यांना प्रतिष्ठानतर्फे हातमोजे, मास्क देण्यात आले़
स्वच्छता करण्यासाठी घमेली, खोरी, टिकाव व इतर साहित्य सदस्यांनी स्वत: आणले होते़ गोळा केलेला कचरा डेपोपर्यंत नेण्यासाठी वाहनांची सोय श्री सदस्यांनीच केली होती़ (प्रतिनिधी)

२२ मार्च रोजीही स्वच्छता अभियान
डॉ़ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दि़ २२ मार्च रोजी किकली, पसरणी (ता़ वाई), खडकी, खर्शी (ता़ जावली), नेले, कोपर्डे (ता़ सातारा), नांदगाव (ता़ कोरेगाव), खातगुण (ता़ खटाव), येळगाव (ता़ कराड) या ग्रामपंचायतींच्या कार्यकक्षेत ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे़

Web Title: Send a message of cleanliness to the spirituality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.