Ashadhi Wari: पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरस्तीसाठी प्रस्ताव पाठवा - मंत्री जयकुमार गोरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:03 IST2025-04-09T15:03:12+5:302025-04-09T15:03:30+5:30

पुणे येथील विभागीय आढावा बैठकीत सूचना

Send proposal for repair of roads and palanquins on palanquin route says Minister Jayakumar Gore | Ashadhi Wari: पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरस्तीसाठी प्रस्ताव पाठवा - मंत्री जयकुमार गोरे 

Ashadhi Wari: पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरस्तीसाठी प्रस्ताव पाठवा - मंत्री जयकुमार गोरे 

दहिवडी : ‘ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासह पालखी मार्गावरील रस्ते, पालखीतळ दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव दोन दिवसांत पाठवा. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या अडचणीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याच्या कामांना मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल,’ अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्रीजयकुमार गोरे यांनी केले.

पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढी वारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त अरुण आनंदकर, उपायुक्त विजय मुळीक, नितीन माने, दत्तात्रय लांघी, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘ प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती स्वच्छतागृह आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण ही निटपणे होईल याकडे लक्ष द्यावे. पालखी मार्गावरील रेस्टॉरंट, हॉटेल्स यांची स्वच्छता व अन्न शुद्धतेची खात्री करावी. तसेच पंढरपूर शहरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी.

पंढरपूर शहरात सोलापूर जिल्हा परिषद व पोलिस प्रशासनाने ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवावी. वारी दरम्यान देण्यात आलेल्या कामांसाठी कंत्राटदारांकडून अटी व शर्तीचे पालन करुन कामे होण्यासाठी त्यांच्यावर शासकीय यंत्रणेने अंकुश ठेवावा. ग्रामपंचायतींना आगाऊ निधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल. पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.’

विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे केलेल्या नियोजनाची माहिती दिली. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार पेट्या, निवारा केंद्र, हिरकणी कक्ष आदी सुविधांसोबत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून दिलेल्या सूचनांचे पालन करावे.’

जाणून घेतल्या सर्वच जिल्ह्यांच्या अडचणी

बैठकीत मंत्री गोरे यांनी वारीच्या अनुषंगाने सर्वच जिल्ह्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती बैठकीत दिली.

Web Title: Send proposal for repair of roads and palanquins on palanquin route says Minister Jayakumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.