पैसे देऊन कोरोनाची लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिक पुढेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:09 AM2021-03-13T05:09:43+5:302021-03-13T05:09:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असल्यामुळे वयोवृद्ध लोक अस्वस्थ झाले आहेत. घरातल्या लोकांकडून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असल्यामुळे वयोवृद्ध लोक अस्वस्थ झाले आहेत. घरातल्या लोकांकडून वयोवृद्धांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात असून, पैसे देऊन कोरोनाची लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिक पुढेच असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात गत वर्षी कोरोनाने हाहाकार माजवला होता. यात सर्वाधिक वयोवृद्धांचे बळी गेले होते. त्यामुळे यंदाही ही परिस्थिती ओढावू नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड खबरदारी घेतली आहे. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने ज्येष्ठांसाठी हे वर्षे संजीवनी ठरले आहे. शासकीय रुग्णालयामध्ये वाट न पाहत बसता खासगी रुग्णालयाचा अनेकांनी रस्ता धरला आहे. अडीचे रुपये देऊन लस घेत आहेत. पैसे गेले तरी चालतील; पण लस घेतली पाहिजे, अशी भावना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची झाली आहे. परिणामी शासकीय रुग्णालयात गर्दी कमी झाली आहे.
तरुणांपेक्षा ज्येष्ठ एक पाऊल पुढे?
प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना कोरोनाची लागण होते. असा समज अनेक युवकांमध्ये आहे. त्यामुळे युवक वर्ग लस घेताना मागच्या हातावर आहे. परंतु ज्येष्ठ नागरिक स्वत:च्या प्रकृतीविषयी जागृत झाले आहेत. अगोदरच विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठांना या कोरोनामुळे आणखीनच भयभीत करून सोडलंय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लस घ्यायचीच, असा ठाम निर्धार करून ज्येष्ठ लोक लस घेण्यात एक पाऊल पुढे आहेत.
मी लस घेतली, तुम्ही..?
अडीचशे रुपयांत लस खासगी रुग्णालयामध्ये मिळत आहे. एवढ्या स्वस्थ लस आपल्याला मिळाली आहे. खर तर सर्व ज्येष्ठांनी ही लस घेतली पाहिजे. ही लस घेतल्यानंतर आत्मविश्वास तर येतोच, शिवाय जगण्याची उमेद वाढतेय.
- सदाशिवराव जाधव,
यादोगोपाळ पेठ, सातारा
शासकीय रुग्णालयामध्ये बहुतांश वेळा स्वच्छतेचा अभाव असतो. त्यामुळे खासगी रुग्णालयात आम्ही लस घेतली. आता दुसरा डोससुद्धा घेणार आहे. लशीचे कोणतेही परिणाम नसून सर्वांनी ही लस घेणे गरजेचे आहे.
- माधव कारखानीस,
मंगळवार पेठ, सातारा
लस घेण्यात महिला मागे....
ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यास सहमती दर्शवली आहे. त्या प्रमाणात वयोवृद्ध महिलांकडून लस घेण्यासाठी प्रतिसाद दिसत नाही. केवळ सात ते आठ टक्के महिलांनी लस घेतली आहे. त्यामुळे शासनाकडून अशा वयोवृद्ध महिलांना आवाहन करणे गरजेचे आहे.
१९,२३९
जणांनी आतापर्यंत दिली लस
८३
शासकीय
२२
खासगी
वयानुसार
१५,८७८
ज्येष्ठ
३,३६१
इतर