काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

By दीपक शिंदे | Published: May 19, 2024 11:50 AM2024-05-19T11:50:01+5:302024-05-19T11:51:14+5:30

१९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले.

Senior Congress leader Prataprao Bhosale passed away | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

सातारा :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झाले.  भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी ४ वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केले. त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून ३ वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर त्यांनी १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले.

या कालावधीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम, कण्हेर धरण, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात मोलाचे योगदान दिले.

अत्यंत सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, विचारांची पक्की बैठक आणि स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. प्रतापराव भोसले यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे तीन सुपुत्र, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सूना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.

आज दुपारी ४ वाजता प्रतापराव भोसले यांची अंत्ययात्रा निघणार असून दुपारी ५ वाजता भुईंज येथे देगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: Senior Congress leader Prataprao Bhosale passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.