सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ले घातक : सुनीती
By admin | Published: February 18, 2015 09:40 PM2015-02-18T21:40:46+5:302015-02-18T23:54:34+5:30
‘संत तुकाराम, सॉक्रेटीस गॅलिलिओ यांना सत्याच्या, ज्ञानाच्या कारणासाठी प्राण गमवावे लागले. आज जगात सगळीकडे भूलभुलैय्या आहे.
कऱ्हाड : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले समाजासाठी घातक आहेत. मानवतेकडे जाणे हीच खरी माणुसकी आहे. मानवाधिकार आहे,’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांनी केले.
येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, प्रा. डॉ. अमृता देशमुख, उपप्राचार्य डॉ. आत्माराम जगदाळे, प्रा. अजित गाढवे आदी उपस्थित होते. सुनीती सु. र. म्हणाल्या, ‘वंचित लोक, स्त्री, दलित, श्रमिक, आदिवासी, अल्पसंख्यांक आपल्या जगण्याच्या हक्कांसाठी लढत आहेत. पण, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावर अशा राष्ट्रीय चर्चासत्रातून चर्चा व्हायला पाहिजे. दुसऱ्याच्या हक्कावर आक्रमण करून त्याचे माणुसपण हिरावून घेण्याची प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
‘संत तुकाराम, सॉक्रेटीस गॅलिलिओ यांना सत्याच्या, ज्ञानाच्या कारणासाठी प्राण गमवावे लागले. आज जगात सगळीकडे भूलभुलैय्या आहे. निसर्गाने स्वत:ला विकसित केले; पण आपण अजूनही स्वत:ला विकसित करू शकलो नाही. त्यामुळे मानवाधिकार हिरावून घेतले जातात,’ अशी खंत यावेळी प्राचार्य पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.
प्रा. अजित गाढवे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. आत्माराम जगदाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)