जखमीच्या वेदनांवर संवेदनशीलतेची फुंकर!
By admin | Published: March 3, 2015 10:07 PM2015-03-03T22:07:25+5:302015-03-03T22:46:24+5:30
रंगकर्मी धावले : अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या उपचारांसाठी २१ हजारांची उभारणी
सातारा : कलावंत संवेदनशील असतो; किंबहुना असावा लागतो, असे नेहमी म्हटले जाते. परंतु हे केवळ सुभाषित नसून वास्तव आहे, याचा प्रत्यय जखमी रिक्षाचालकाला नुकताच आला. भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले संतोष पवार यांच्यावर उपचार करण्यासाठी सातारच्या रंगकर्मींनी अल्पावधीत तब्बल २१ हजार रुपयांचा निधी उभारला. संतोष पवार यांचा रिक्षा व्यवसाय आहे. ते क्षेत्र माहुलीचे रहिवासी. त्यांचे बंधू नारायण पवार यांचा सातारच्या अनेक नाट्यसंस्था आणि रंगकर्मींशी निकटचा संबंध. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी अनेकदा अभिनयही केला आहे. सध्या व्यवसायानिमित्त ते पुण्यात स्थायिक झाले असून, सुटीच्या दिवशीच त्यांचा रंगकर्मी मित्रांशी संबंध येतो. परंतु हाच छोटासा धागा इतका मजबूत ठरला की, बंधूंच्या भीषण अपघातानंतर तणावाच्या दिवसांत आर्थिक चिंतेचा भार ज्ञात-अज्ञात रंगकर्मींनी स्वत:च्या शिरावर घेतला.क्षेत्र माहुलीकडे जाताना कृष्णा पुलाच्या पुढे एक वळण आहे. गेल्या शनिवारी (दि. २१) संतोष यांच्या रिक्षाने हे वळण ओलांडले आणि अचानक दोन कुत्री रिक्षाला आडवी आली. एक कुत्रे रिक्षाच्या चाकात अडकून बसले आणि रिक्षाने दोन-तीन पलट्या खाल्ल्या. रिक्षात प्रवासी होते; मात्र सुदैवाने त्यांना फारशी दुखापत झाली नाही. संतोष मात्र गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. मेंदूला सूज आली होती. अशा अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बंधू नारायण यांना हा प्रकार समजताच त्यांनी रंगकर्मी मित्रांना या घटनेची कल्पना दिली.
रंगकर्मींनी एकमेकांना निरोप देतानाच संतोष यांच्या उपचारांसाठी निधी जमविण्याचा प्रयत्न सुरू केला. नाट्य परिषदेच्या सातारा शाखेचे कार्यवाह राजेश मोरे यांनी व्हॉट्स अॅपवर सर्वांना तसा संदेश दिला. अनेक रंगकर्मींनी प्रत्येकी दहा ते पंधरा जणांना निरोप पोहोचवून प्रत्येकाकडून निधी जमविण्याची जबाबदारी स्वीकारली.
निधी देणाऱ्यांपैकी बहुतांश रंगकर्मी दिवसभर नोकरी-व्यवसाय सांभाळून संध्याकाळी नाटक करणारे. अनेकांची आर्थिक स्थितीही बेताची तरीही प्रत्येकाने आपापल्या परीने पैसे दिले आणि इतरांकडूनही जमा केले. निधी देणाऱ्यांपैकी काही जणांना तर नारायण आणि संतोष पवार माहीतसुद्धा नाहीत. काहीजण नोकरीनिमित्त परगावी स्थायिक झालेले. रंगभूमी हाच एकमेकांना जोडणारा एकमेव धागा.
सुधीर पवार, राजीव अत्रे, प्रा. संजय साठे, मनोज जाधव, गजानन वाडेकर, प्रकाश टोपे, संदीप जंगम, रवींद्र डांगे, चंद्रकांत कांबिरे, विजय लाटकर, बाळकृष्ण शिंदे, मिलिंद वाळिंबे, अमर आणि आनंद रेमणे, जितेंद्र खाडीलकर, सबनीस आढाव, अमोल जोशी, सुनील भोईटे, मंदार माटे, धैर्यशील उतेकर, गणेश मायने, प्रसाद देवळेकर, राजेश नारकर, अमित देशमुख आदींनी धावपळ करून २१ हजारांचा निधी अल्पावधीत जमा केला. उपचार घेऊन संतोष पवार आता घरी परतले आहेत. (प्रतिनिधी)
यापूर्वीही अनेकांना मदत
यापूर्वीही सातारच्या रंगकर्मींनी सगळे भेदाभेद विसरून अनेकदा अनेकांची गरज भागविली आहे. रंगकर्मी बाळकृष्ण शिंदे यांचे बंधू संतोष शिंदे यांच्यावर दीर्घकालीन उपचार सुरू असताना रंगकर्मींनी अशाच प्रकारे एकवीस हजारांची रक्कम जमविली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी एका नोकरदार रंगकर्मीच्या कंपनीमालकानेही पाच हजार रुपये दिले होते. एका ट्रस्टकडून रंगकर्मींंनी पाच हजार रुपये मंजूर करून घेतले होते. सागरकन्या स्नेहल कदम हिच्या जलतरण मोहिमेसाठीही रंगकर्मींनी पाच हजार जमविले होते.