चाकूने वार करून तिघांना जखमी करणाऱ्या आरोपीला शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 03:32 PM2019-04-01T15:32:31+5:302019-04-01T15:35:18+5:30
पत्नीच्या औषधोपचारासाठी एक हजार रुपये न दिल्याने तिघांवर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायदंडाधिकारी व्ही. एस. मडके यांनी राजू दीपक साळुंखे (वय ४५, रा. झेंडा चौक, करंजे पेठ, सातारा) याला दोन वर्षे ५६ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
सातारा : पत्नीच्या औषधोपचारासाठी एक हजार रुपये न दिल्याने तिघांवर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायदंडाधिकारी व्ही. एस. मडके यांनी राजू दीपक साळुंखे (वय ४५, रा. झेंडा चौक, करंजे पेठ, सातारा) याला दोन वर्षे ५६ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, रहिनाथ श्रीधर लोणकर (वय ३५,रा. बाबर कॉलनी, करंजे पेठ, सातारा) यांच्याकडे आरोपी राजू साळुंखे याने १ मार्च २०१७ रोजी पत्नीच्या औषधोपचारासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे देण्यास लोणकर यांनी नकार देताच चिडलेल्या राजू साळुंखे याने त्यांच्यावर चाकूने वार केले.
हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या अंजना शंकर कदम (रा. करंजे पेठ, सातारा), शालन गोविंद लिंगाळे (रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) यांच्या हातावर आणि गळ्यावर चाकूने वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. या प्रकाराची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी राजू साळुंखे याला अटक केली होती.
पोलीस उपनिरीक्षक पी. बी. कदम यांनी पोलीस नाईक लेंभे, पोलीस नाईक घोडके, हवालदार कुमठेकर यांच्या मदतीने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने राजू साळुंखे याला दोन वर्षे ५६ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. पुष्पा जाधव यांनी काम पाहिले. पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे सहायक फौजदार शशिकांत भोसले यांनी त्यांना सहकार्य केले.