तीन तालुक्यांमध्ये लहान मुलांसाठीही स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:31+5:302021-05-24T04:38:31+5:30
वाई : वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच सहाशे रुग्णांवर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपचार ...
वाई : वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच सहाशे रुग्णांवर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपचार होतील, अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. यासाठी प्रशासन, जिल्ह्यातील औद्योगिक व सामाजिक संघटनांनी मोलाचे सहकार्य केल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
वाई ग्रामीण रुग्णालय, मॅप्रो कोविड रुग्णालय, कवठे उपकेंद्रात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर यंत्रणा उभारण्यात आली आहे. तालुक्यात एकशे साठ रुग्णांची सोय होणार आहे. त्याचप्रमाणे खंडाळा ग्रामीण रुग्णालय येथे ३१ ऑक्सिजन खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याच परिसरात एशियन पेंट सुमारे दीड कोटी खर्चाचे अद्ययावत अतिदक्षता विभागासह रुग्णालय उभारत आहे. पुढील तीन महिन्यांत हे रुग्णालय पूर्ण करण्यात येणार आहे. जगताप रुग्णालयात आणखी दीडशे ऑक्सिजन खाटा वाढविण्यात येणार असून, यामुळे येथे दोनशे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध होतील. तसेच गरज भासल्यास लोणंद येथेही रुग्णालय उभारण्यात येईल. तापोळा, डॉन ॲकॅडमी व बेल एअर रुग्णालय, पाचगणी येथेही दोनशे कक्ष सुरु आहेत. सध्या सर्वत्र ऑक्सिजन व व्हेंटिलेटर असे अद्ययावत उपचार सुरु आहेत. वाई मतदार संघात तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. महाबळेश्वर, वाई व खंडाळा येथे लहान मुलांसाठीही येथेच स्वतंत्र कक्ष सुरू झाला आहे. महसूल व आरोग्य यंत्रणा एकत्रित व समन्वयाने काम करत असल्याने चांगले उपचार होऊन रुग्ण घरी परतल्याने रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक समाधान व्यक्त करत असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.