जकातवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:37+5:302021-06-01T04:28:37+5:30
शेंद्रे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायत जकातवाडीमार्फत गावातील प्राथमिक शाळेत पंधरा बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात ...
शेंद्रे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायत जकातवाडीमार्फत गावातील प्राथमिक शाळेत पंधरा बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेला हा विलगीकरण कक्ष गावातील लोकांसाठी संजीवनी ठरत आहे. या विलगीकरण कक्षामध्ये कोरोनाबाधित लोकांच्या करमणुकीसाठी एक टीव्ही संच, ऑडिओ, व्हिडिओ सिस्टिम बसविण्यात आली आहे. तसेच या विलगीकरण कक्षात गरम पाण्याचीही सोय करण्यात आली आहे.
या विलगीकरण केंद्रात कोरोनाबाधित व्यक्तींसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत पौष्टिक आहार देण्यात येत आहे. या विलगीकरण कक्षात दररोज डॉक्टरांचा राऊंड होत असून, गरीब गरजू लोकांना मोफत औषध उपचार देण्यात येत आहे. या विलगीकरण केंद्रात गावातील स्वयंसेवक काम करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणारा सकाळचा नाष्टा तसेच दुपारी व रात्रीच्या जेवणाची सोय योगेश शिंदे मित्रसमूह व निरंजन फडणीस यांनी स्वखर्चाने केलेली आहे. या उपक्रमास गावातील नागरिकांना मदत करायची असल्यास जकातवाडी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच चंद्रकांत सणस यांनी केले आहे.
३१शेंद्रे
सातारा तालुक्यातील जकातवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सोयी-सुविधा असलेला विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.