बिबीत लोकसहभागातून विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:37 AM2021-05-26T04:37:55+5:302021-05-26T04:37:55+5:30
आदर्की : बिबी (ता. फलटण) गावात कोरोना रुग्णांची तसेच मृतांची संख्या वाढू लागली आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता ...
आदर्की : बिबी (ता. फलटण) गावात कोरोना रुग्णांची तसेच मृतांची संख्या वाढू लागली आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता ग्रामस्थ, सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. सर्वांनी लोकसहभागातून दोनच दिवसांत तीस बेडचा विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.
बिबी येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीमध्ये कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. गावात मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी कुठेतरी खंडित व्हायला हवी यासाठी ग्रामस्थ, तरुण व सामाजिक संघटनांनी पुढे येऊन गावात विलगीकरण कक्ष सुरू करावा, अशी संकल्पना मांडण्यात आली. या संकल्पनेला सर्वांनीच समर्थन दिले व प्रत्येकाने खारीचा वाट उचलत गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले.
गावातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या खोल्यांची साफसफाई करून येथे तीस बेडचा विलगीकरण कक्ष दोनच दिवसांत सुरू करण्यात आला. या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी वाफारा मशीन, तापमान व ऑक्सिजन तपासणी मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण गावातील अन्नदाते देत असतात. सकाळ, संध्याकाळ गावातील डॉक्टर व प्राथमिक आरोग्य कर्मचारी रुग्णांची तपासणी करीत आहेत. या विलगीकरण कक्षास आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, डॉ. संदीप खताळ यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
फोटो : बिबी, ता. फलटण येथील कोराेना विलगीकरण कक्षाची संजीवराजे निंबाळकर, आ. दीपक चव्हाण यांनी पाहणी केली. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)