पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:38 AM2021-04-24T04:38:59+5:302021-04-24T04:38:59+5:30

महाबळेश्वर : ‘शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय ...

Separation room facility on behalf of the municipality | पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय

पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय

Next

महाबळेश्वर : ‘शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हाॅटेल ताब्यात घेतली असून, ही सोयीसाठी नाममात्र शुल्क घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी दिली.

महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना त्या बोलत होत्या, यावेळी नगरसेवक कुमार शिंदे उपस्थित होते .

नगराध्यक्षा शिंदे म्हणाल्या, ‘कोरोनाचा कहर जिल्हयात सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक प्रयत्न करून ही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी भरली आहे. रुग्णांसाठी बेड शोधण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे. कोरोनाची लागण झाली आहे, परंतु कोणतीही लक्षणे दिसत नाही, अशा रुग्णांना विलगीकरणात राहण्यास सांगितले जाते, परंतु अनेक कुटुंबात अशी स्वतंत्र सोय करणे अशक्य होत आहे. अशा रुग्णांसाठी मागील वर्षी येथील पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले होते, परंतु आता ते सेंटर बंद केले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची गैरसोय होत आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी पालिकेला कोरोना केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांची भटकंती थांबावी, यासाठी विलगीकरणाची सोय करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.’

शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता, सध्या दोन हाॅटेल पालिकेने ताब्यात घेतली आहेत. मागणीनुसार आणखी दोन हाॅटेल पालिका ताब्यात घेऊन तेथेही विलगीकरण कक्ष सुरू करणार आहे. विलगीकरण कक्षात प्रवेश मिळावा, यासाठी पालिकेने नाममात्र शुल्क ठेवले आहे. सतरा दिवसांच्या सोईसाठी कोरोनाबाधित रुग्णांना पाच हजार रुपये आकार ठेवण्यात आला आहे. यामध्ये दोन वेळचा नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली आहे. विलगीकरण कक्षात प्रवेशासाठी रुग्णांनी अथवा नातेवाइकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व लिपिक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

चौकट

आयसोलेशन किट मिळणार

याशिवाय एक होम आयसोलेशन किट देण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत. ऑक्सिमीटर, थर्मामीटर, हातमोजे, मास्क, साबण, सॅनिटायझर असणार आहे. पालिकेच्या वतीने रोज डाॅक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार औषधे दिली जाणार आहेत. रुग्णांनी विलगीकरण कक्षात येताना, केवळ आपल्याबरोबर कपडे टाॅवेल व पांघरून आणायचे आहे.

Web Title: Separation room facility on behalf of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.