श्रीपालवण येथे विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:38+5:302021-06-02T04:28:38+5:30
विलगीकरण कक्ष दहिवडी : माण तालुक्यातील श्रीपालवण येथील प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन ...
विलगीकरण कक्ष
दहिवडी : माण तालुक्यातील श्रीपालवण येथील प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन सरपंच संगीता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून कोरोनाला रोखण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. या कक्षात बेडची व्यवस्था उपसरपंच रवींद्र ढेंबरे, उद्योजक कालिदास पिसाळ व ग्रामपंचायत सदस्यांनी केली. अत्यावश्यक सर्व सुविधा ग्रामपंचायतीमार्फत पुरविल्या जाणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना
रिपाइंचे निवेदन
सातारा : निधीअभावी कोरोना प्रतिबंंधासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या सर्किट हाऊस, नियोजन भवन, पोवई नाका ते वाढे फाटा रस्ता ही कोट्यवधींची कामे रद्द करून ताे निधी कोरोनासाठी उपलब्ध करावा, अशी मागणी रिपाइं (ए) च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ, जयवंत कांबळे, किरण ओव्हाळ यांनी दिला आहे.
सातारा-कोंडवे
रस्त्याची दुरवस्था
वाठार स्टेशन : सातारा-कोंडवे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. साताऱ्यातील मोळाचा ओढा ते कोंडवे या मार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधारकांना अनेक अडचणी निर्माण होत आहे. बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु एका बाजूचा रस्ता मोठ्या प्रमाणात उघडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. संपूर्र्ण मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून केली जात आहे.
पथदिवे बंद;
नागरिक त्रस्त
सातारा : चार भिंती व शाहूनगर मार्गावरील पथदिवे बंद असल्याने शाहूनगर व परिसरातील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळी चाचपडत चालावे लागत आहे. हा भाग नुकताच हद्दवाढीत आला असून, पालिकेने येथील मूलभूत प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे आहे. पालिकेने पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.