शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सेवागिरी महाराजांनी बळ द्यावे
By admin | Published: January 8, 2016 11:28 PM2016-01-08T23:28:20+5:302016-01-09T00:57:41+5:30
गिरीश बापट : राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन; यात्रेकरूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुसेगाव : ‘सरकार, विरोधी पक्ष व विद्यमान सदस्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हल्लाबोल केला तर विविध प्रश्न तातडीने मार्गी लागतील. नैसर्गिक असमतोलामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी श्री सेवागिरी महाराजांनी बळ द्यावे,’ असे साकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पुसेगाव येथील राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘श्रीं’च्या चरणी घातले.
यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, विजय जाधव, शुअरशॉट इव्हेंटचे संचालक संदीप गिड्डे, किरण बर्गे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार साळुंखे, बाळासाहेब जाधव, दादासाहेब काळे, चांगदेव बागल, विठ्ठलराव भुजबळ, अरुण जाधव, विशाल बागल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बापट म्हणाले, ‘शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवत आहे. या योजना यशस्वी करण्याची जबाबदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर असते. शेतकरी आणि संबंधित अधिकारी अधिक जागृत असल्यास येणारे दिवस निश्चितच उज्ज्वल असतील.
राजकारण हा निवडणुकीपुरता मर्यादित ठेवून इतर वेळी सर्व पक्षांनी सामाजिक बांधिंलकीच्या जाणिवेतून एकत्र येण्याची गरज आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय केला पाहिजे. दिवसेंदिवस निर्सग बदलत आहे. त्याचा मोठा फटका शेतकरी
वर्गाला बसत आहे. शेतकऱ्यांची कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी व त्याचे कुटुंब सुस्थितीत राहिले तरच शासनव्यवस्था अबाधित राहू शकते. आपत्कालीन परिस्थितीत शासनव्यवस्था चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.’
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार’ योजनेचा पायाच खटाव-माणच्या मातीत असून, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने येरळा नदी पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून प्रभावी काम सुरू केले आहे. शासनाने निधी वाटपाबाबत दुष्काळी व टंचाईग्रस्त तालुक्यांना झुकते माप द्यावे. जिहे-कठापूर योजना खटाव-माणला नवसंजीवनी देणार असल्यामुळे शासनाने तातडीने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.’
प्रास्ताविकभाषणात डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘येरळा नदी पुनरुज्जीवन योजना यशस्वी राबविण्यासाठी शासकीय व अशासकीय निधी मिळवून देण्यासाठी तसेच तीर्थक्षेत्राच्या ‘ब’
वर्गातून येथील देवस्थानला निधीची तरतूद करावी, नेर धरणातील जलसाठापैकी ठराविक साठा रथोत्सव काळासाठी राखीव करण्याची तरतूद करावी.’
यावेळी आ. आनंदराव पाटील यांचेही भाषण झाले.
दरम्यान, देवस्थान ट्रस्टच्या वतीने निवडक १२ शेतकऱ्यांना ‘शेतीनिष्ठ’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. तसेच या कृषीप्रदर्शनाचे नेटके नियोजन केल्याबद्दल शुअरशॉट इव्हेंटचे संचालक संदीप गिड्डे यांचा सत्कार करण्यात आला. मोहन गुरव यांनी सूत्रसंचलन केले. (वार्ताहर)
... तर माण-खटाव सुजलाम्-सुफलाम् : चव्हाण
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसशेती केली जात असून, यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असतो. या पाण्याची ५० टक्के बचत करण्यासाठी ऊसशेती पूर्णत: ठिबक सिंचनद्वारे केली पाहिजे, यासाठी जनजागृतीबरोबर ठिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना वेळेत दिले गेले पाहिजे. मुख्यमंत्री असताना जिहे-कठापूर योजनेसाठी मंजूर केलेल्या १६० कोटींपैकी ८० कोटी अदा केले आहेत. उर्वरित रक्कम या शासनाने दिल्यास खटाव-माण हा भाग सुजलाम्-सुफलाम् होईल,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘जिहे-कठापूर’साठी निधीची तरतूद करू
मानसिक समाधानासाठी श्रद्धा आवश्यक आहेच; पण त्यापुढे जाऊन शेती व वैज्ञानिक विकासासाठीही विषेश प्रयत्न देवस्थानच्या माध्यमातून झाले पाहिजेत. शासनावर नैसर्गिक संकाटामुळे निधीचा अतिरिक्त ताण असल्याने बजेटशिवाय एक हजार कोटी निधी खर्च झाला आहे. त्यामुळे आगामी काळात खटाव-माण साठी वरदान ठरणाऱ्या जिहे-कठापूर योजनेसाठी निधीची लवकरच तरतूद करू, असे आश्वासन त्यांनी दिले.