आपसातील वाद गावातच मिटवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:54+5:302021-09-10T04:46:54+5:30
मल्हारपेठ : ‘सार्वजनिक जीवनात ग्रामीण भागातील खेडोपाडी निर्माण होणारे छोटे मोठे वाद हे गावातच मिटवावेत. पोलीस स्टेशनला यायची वेळ ...
मल्हारपेठ : ‘सार्वजनिक जीवनात ग्रामीण भागातील खेडोपाडी निर्माण होणारे छोटे मोठे वाद हे गावातच मिटवावेत. पोलीस स्टेशनला यायची वेळ येऊच नये, यासाठी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांनी समन्वय साधून गावातील तंंटे गावातच मिटवावेत,’ असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यानी व्यक्त केले.
मल्हारपेठ, ता. पाटण येथे शासन आदेशानुसार सुरू होत असलेल्या मल्हार पेठ पोलीस स्टेशनचा प्रारंभ गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील, मल्हारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, उपनिरीक्षक अजित पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदु आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तालुक्यात कुठेही मोठा प्रसंग घडलेला नाही. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस हा जनतेचा मित्र असला पाहिजे. गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी दिवंगत आर. आर. पाटील यांनी निर्णय घेऊन तंटामुक्त समित्या स्थापन केल्या. त्यामुळे पोलिसांचा ताण कमी झाला आहे. मी गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसाच्या निवासाचा प्रश्न मिटवण्यासाठी ७५० कोटीची तरतूद केली आहे. तर नव्याने काही पोलीस स्टेशनच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यापैकी मल्हारपेठ पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लावला आहे. लवकरच नवीन इमारतीत सर्व कामे सुरु होतील.
फोटो : ०९केआरडी०१
कॅप्शन : मल्हारपेठ, ता. पाटण येथे पोलीस स्टेशनच्या प्रारंभप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे भाषण झाले.