‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये २६९ तक्रारींचा निपटारा 

By नितीन काळेल | Published: June 27, 2024 07:53 PM2024-06-27T19:53:48+5:302024-06-27T19:53:55+5:30

रुपाली चाकणकर : साताऱ्यातील महिला बचत गट काम राज्यात होण्यासाठी शिफारास करणार 

Settlement of 269 complaints in 'Women's Commission Apna Dari' : Rupali chakankar | ‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये २६९ तक्रारींचा निपटारा 

‘महिला आयोग आपल्या दारी’मध्ये २६९ तक्रारींचा निपटारा 

लोकमत न्यूज नेटवर्क 
सातारा : सातारा जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे चांगले विणले असून यातून सबलीकरणही झाले आहे. त्यामुळे साताऱ्यातील हे काम राज्यातही राबवावे अशी शिफारस शासनाकडे करणार आहे. त्याचबरोबर महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांत २६९ तक्रारी आल्या. सर्वाधिक वैवाहिक आणि काैटुंबिक समस्यांच्या होत्या. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारींबाबत सुनावणी झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, पुरूषांबरोबर महिलांचीही विविध ठिकाणी काम करण्याची संख्या वाढत चालली आहे. महिला सुरक्षित राहण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. साताऱ्यात आढावा घेताना जिल्ह्याचे काम चांगले असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात अनेक बालविवाह थांबविण्यात आले. तसेच याप्रकरणात दोन गुन्हेही दाखल झाले आहेत. पोलिसांचा भरोसा सेल, मिसींग सेल चांगले काम करत आहे. निर्भया पथकांकडूनही कारवाई होत आहे. जिल्ह्यातील उपक्रमात २६९ तक्रारी दाखल झाल्या. सर्वाधिक १४५ तक्रारी या कौटुंबीक आणि वैवाहिक होत्या.
वसई येथील तरुणीचा खून केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर चाकणकर म्हणाल्या, आरोपी तरुण हा उत्तरप्रदेश तर तरुणी हरियाणातील होती. तरुणीवर हल्ला होताना बघ्यांची संख्या अधिक होती. त्यातील दोघांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, तरुण हिंसक झाला होता. या प्रकरणात संबंधित तरुणाला अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

..................

स्त्री भ्रूण हत्या टाळण्यासाठी धाडसत्र राबवा; तिन्ही अधिकाऱ्यांचे काैतुक... 

आजही वंशाचा दिवा म्हणून मुलाकडे पाहिले जाते. त्यामुळे समाजात स्त्री भ्रूण हत्या ही गंभीर बाब बनली आहे. यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात धाडसत्र सुरू करावे. कोणत्या रुग्णालयात गर्भपात करण्यात येत असतील तर याची माहिती घ्यावी, अशी सूचना संबंधितांना करण्यात आली असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. तसेच त्यांनी सातारचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांचे काैतुक केले. तिघेही तरुण असून त्यांचे काम चांगले असल्याचे स्पष्ट केले.
 

Web Title: Settlement of 269 complaints in 'Women's Commission Apna Dari' : Rupali chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.