कोतवालांच्या प्रलंबित समस्यांबाबत विधिमंडळात लक्षवेधी मांडणार
By admin | Published: March 28, 2016 08:16 PM2016-03-28T20:16:26+5:302016-03-29T00:13:10+5:30
आमदार शंभूराज देसाई
मल्हारपेठ : ‘गेली अनेक वर्षे महसूल विभागात तलाठ्यांचे सहकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कोतवालांना न्याय मिळावा यासाठी संघटनेमार्फत शासन दरबारी लढा चालू आहे. परंतु अनेकवेळा शासनाकडून नुसती आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे कोतवालांच्या प्रश्नांबाबत विधीमंडळात लक्षवेधी मांडून शासनाकडून योग्य तो न्याय मिळवून देणार आहे,’ असे आश्वासन आमदार शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुका कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शंभूराज देसाई यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा मिळावा, वेतनश्रेणी ठरवावी, पूर्ण वेळ महसूल लिपिकांचे महसूल सहायक करावे, सेवानिवृत्त कोतवालांना व दिवंगत कोतवालांच्या विधवांना ३ हजार प्रतीमाह निर्वाह भत्ता देण्यात यावा, सध्याचे ५०१० रुपये मानधन न परवडणारे आहे असून ते वाढवावे, अशा मागण्या यावेळी पदाधिकाऱ्यांनी केल्या. कोतवाल हे जनता व प्रशासन यांच्यातील दुवा आहे. महसूल खात्यातील कोतवाल महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
कोतवाल संघटनेचे अध्यक्ष मोहन कवर, कार्याध्यक्ष मिलिंद मस्के, अजित पानस्कर, माधव चव्हाण, प्रवीण उदुगडे, सुनील कांबळे, गणेश पवार, बाजीराव चव्हाण, निवास सुतार, कृष्णत सावंत, किसन जाधव, सूरजकुमार पुजारी, प्रशांत सपकाळ, अरुण जाधव यांच्यासह सर्वच पदाधिकारी व कोतवाल सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)