पालकांना दिलासा!, साताऱ्यात सेतू कार्यालय शनिवारी-रविवारीही सुरू राहणार

By दीपक देशमुख | Published: June 26, 2024 06:40 PM2024-06-26T18:40:08+5:302024-06-26T18:42:59+5:30

सातारा तहसीलदारांच्या सूचना 

Setu office in Satara will be open on Saturdays and Sundays to avoid inconvenience to students due to lack of certificates | पालकांना दिलासा!, साताऱ्यात सेतू कार्यालय शनिवारी-रविवारीही सुरू राहणार

पालकांना दिलासा!, साताऱ्यात सेतू कार्यालय शनिवारी-रविवारीही सुरू राहणार

सातारा : शैक्षिणक वा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सवलती, तसेच अन्य सुविधा मिळविण्यासाठी अनेक प्रकारचे दाखले प्रवेश अर्जावेळी जोडावे लागतात. त्यामुळे सेतू कार्यालयात पालकांची रांग लागलेली असते. दाखल्याअभावी कोणाची गैरसोय होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्याशी संवाद साधून तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सातारा तहसील कार्यालयातील सेतू कार्यालय सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सातारा येथील सेतूमधून शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे उत्पन्न, रहिवासी, अर्थिकदृष्ट्या दुर्बल, शेतकरी दाखला, डोंगरी दाखला, अल्पभूधारक, जातीचे दाखले असे विविध प्रकारचे दाखले दिले जातात. सध्या जून महिन्यात दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांची दाखल्यांसाठी धांदल उडाली आहे. वेळेवर दाखला जमा केला नाही, तर प्रवेश, तसेच सवलती रद्द होऊ शकतात. यामुळे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होऊ शकते.

त्यामुळे दाखल्यासाठी हातातील कामे सोडून पालकांना धावपळ करावी लागते. हे टाळण्यासाठी, तसेच प्रवेशप्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सातारा तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयांत जुलै महिनाअखेर शनिवारीही सेतू कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी अर्ज करणाऱ्यांचे दाखले रविवारी वितरित करण्यात येणार आहेत.

सहा महिन्यात ३३,९२३ दाखले वितरित

सातारा सेतू कार्यालयातून जानेवारी २०२४ ते २६ जून २०२४ अखेर विविध प्रकारचे तब्बल ३२ हजार ९२३ एवढे दाखले दिले गेले आहेत.

हेलपाटे, विलंब टळणार

अनेकदा दाखले मिळविण्यासाठी सेतू कार्यालयात नागरिक मोठ्या संख्येने येतात. या दाखल्यासाठी विविध कागदपत्रांची जुळणी करावी लागते. यासाठी वेळ लागतो. कागदपत्रांची जुळणी शुक्रवारी उशिरापर्यंत झाल्यास, आता सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. शनिवारीही सेतू कार्यालय खुले राहणार असून, या दाखल्यांचे वितरण रविवारी होणार आहे. यामुळे विलंबही होणार नाही.

शाळेचे निकाल जाहीर झाले असून प्रवेश शैक्षणिक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी नागरिक सेतू कार्यालयात येत आहेत. यावेळी संगणक प्रणालीतील अडचणी, खंडित होणारा विद्युत पुरवठा, विविध प्रकारच्या शैक्षणिक कारणासाठी आवश्यक असणाऱ्या दाखल्यासाठी वाढलेली मागणी या अडचणींमुळे दाखल्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शनिवारी सेतू कार्यालय सुरू राहणार आहे, तसेच रविवारी या दाखल्यांचे वितरण होणार आहे. जुलैअखेरपर्यंत ही सुविधा देण्यात येणार आहे. - नागेश गायकवाड, तहसीलदार, सातारा.

Web Title: Setu office in Satara will be open on Saturdays and Sundays to avoid inconvenience to students due to lack of certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.