साताऱ्यात साडे सात लाख ‘बहिणी लाडक्या’!
By नितीन काळेल | Published: September 6, 2024 08:11 PM2024-09-06T20:11:23+5:302024-09-06T20:12:34+5:30
अर्जांची संख्या आठ लाखाजवळ : लाभार्थ्यांमध्ये कऱ्हाड तालुका दीड लाखाच्या उंबरठ्यावर
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजनेला सातारा जिल्ह्यात प्रतिसाद असून अर्जांची संख्या आठ लाखांजवळ पोहोचली आहे. तर साडे सात लाखांहून अधिक अर्जांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील लाभार`थी महिलांची संख्या १ लाख ४१ हजारांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यात योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये येणार आहेत.
जून महिन्यात राज्य शासनाने अऱ्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजना जाहीर करण्यात आली. यामध्ये पात्र महिलेला महिन्याला दीड हजार रुपये भेट देण्यात येणार आहे. या अंतर्गत अर्ज नोंदणी करण्यास सुरूवात केली. सातारा जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने मोहीमेला गती दिली आहे. या मोहिमेत अंगणवाडी सेविकांना सामावून घेऊन गावपातळीवर शासकीय कर्मचाऱ्यांची समिती स्थापन केली. त्यामुळे या योजनेच्या नोंदणीला गती मिळाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात नोंदणी मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत या योजनेला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. लाखोंच्या संख्येत अर्ज भरण्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वीपासून जिल्ह्यातील पात्र बहिणींच्या नावावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत कोट्यवधी रुपये बहिणींच्या बॅंक खात्यावर जमा झाले आहेत. पण, दररोजच अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारपर्यंत ७ लाख ८५ हजार ७१ महिलांनी अर्ज केलेला. त्यामधील ७ लाख ५७ हजार ३८५ बहिणींच्या अर्जांना मंजुरी मिळाली होती.