अपहरण करण्यासाठी वापरलेली गाडी जप्त करायची असल्याने सात दिवस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 07:07 PM2020-02-22T19:07:48+5:302020-02-22T19:09:50+5:30
सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, पुनर्वसित, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याप्रकरणी ...
सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, पुनर्वसित, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता दि. २८ पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आशिष बन्सी साळुंखे (वय २९), साहिल रुस्तम शिकलगार (वय २५, दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा), शुभम उर्फ सोन्या संभाजी जाधव (वय ३०, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तेजस जाधव याचा २५ लाखांच्या खंडणीसाठी या तिघांनी खून केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले होते. बोरगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खूनाची कबुली दिली होती. त्यानंतर तेजसचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना शनिवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले. संशयितांनी खून करताना अजून कोणाची मदत घेतली आहे का, अपहरण करण्यासाठी वापरलेली गाडी जप्त करायची असल्याने त्यांना पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला. त्यावर न्यायालयाने संशयितांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी हे करत आहेत.