उंब्रज परिसरातील दोन टोळींतील सातजण हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:41 AM2021-04-02T04:41:35+5:302021-04-02T04:41:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: जिल्ह्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्यांचे गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळींतील एकूण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: जिल्ह्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्यांचे गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळींतील एकूण सातजणांना सातारा, सांगली जिल्ह्यांतील वाळवा व शिराळा, कडेगाव तालुक्यांतून तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, मारामारी, दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या विशाल अशोक दुटाळ (टोळी प्रमुख), किरण आनंदराव पवार (टोळी सदस्य), अविनाश राजेंद्र पवार (टोळी सदस्य), आशुतोष गणेश संकपाळ (सर्व रा. आंधारवाडी, ता. कऱ्हाड) तसेच उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामाऱ्या, आदेशाचा भंग करणाऱ्या टोळीचा प्रमुख पवन ऊर्फ प्रवीण शामराव साळुंखे, राजेंद्र ऊर्फ भिकोबा मारुती मसुगडे (दोघे रा. नवे कवठे, ता. कऱ्हाड), कैलास तात्याबा चव्हाण (रा. कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड) यांना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा हे तालुके, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.
जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या करणाऱ्या टोळीतील सदस्यांकडून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार उंब्रज पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर वेळोवेळी कारवाया केल्या होत्या. त्यानंतरही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. त्यानंतरही संबंधितांच्या वागण्यात काहीच बदल होत नसल्याने स्थानिक पोलीस ठाण्यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठविले होते. त्यावर सुनावणी झाल्यानंतर अखेर बन्सल यांनी संशयितांना हद्दपार केले. हे संशयित हद्दपारीच्या काळात जिल्ह्यात दिसले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश बन्सल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
फोटो आहेतः