एकतीस डिसेंबरसाठी पोलिसांच्या सात टीम : ६० पोलिसांची जादा कुमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:54 PM2018-12-29T23:54:29+5:302018-12-30T00:00:51+5:30
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहर व परिसरात पार्ट्या झडत असतात. उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांच्या सात टीम तयार करण्यात
सातारा : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहर व परिसरात पार्ट्या झडत असतात. उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांच्या सात टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये ६० पोलीस अधिकारी व कर्मचारी असणार आहेत.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहने तपासून सोडण्यात येणार आहेत. लिंबखिंड, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप, बोगदा (समर्थ मंदिर), मोळाचा ओढा या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केंद्रे उभारली आहेत. शाहूपुरी, सातारा तालुका आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ३१ डिसेंबरला होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
वेगवेगळ्या सात टीम तयार करण्यात आल्या असून, यामध्ये साध्या वेशातील पोलिसांचा भरणा जास्त आहे. हे पोलीस रात्री निर्जनस्थळी होणाºया पार्ट्यांवर अंकुश राहावा, यासाठी पाळत ठेवून असणार आहेत. तर या पथकातील काहीजण वाहनांची तपासणी करणार आहेत. मद्यप्राशन करून गाडी चालविणाºयांवरही जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ब्रेथ अॅनालायझरच्या साह्याने विशेषत: वाहन चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. मद्यप्राशन करणाºयांवर गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.
उत्साहाच्या भरात छेडछाडीचेही प्रकार घडत असतात. त्यामुळे पोलिसांनी साध्या वेशातील महिला पोलिसांनाही या टीममध्ये सहभागी केले आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच नाकाबंदी सुरू करण्यात येणार आहे. विशेषत: वाहनांमधून मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा आणला जातो. त्यामुळे प्रत्येक वाहनांची अगदी बारकाईने तपासणी केली जाणार आहे. तीन वर्षांपूर्वी ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी गेलेल्या युवकाचा महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये खून झाला होता. किरकोळ बाचाबाचीतून ही घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून हॉटेल चालक आणि मालकांना पोलिसांनी खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणाºया मालकांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
कास पठारावर विशेष लक्ष
कास पठारावर अनेकजण पार्टी करण्यासाठी जात असतात. बाटल्यांचा खच आणि लाकडे जाळून प्रदूषण केले जात असल्यामुळे या जागतिक वारसा स्थळावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कास पठारावर जाणारे वाहने तपासून सोडण्यात येणार आहेत.