वाईच्या शासकीय शिबिरात सात हजार अर्ज
By admin | Published: July 11, 2014 12:23 AM2014-07-11T00:23:08+5:302014-07-11T00:30:22+5:30
शिधापत्रिकेत बदल :
शासकीय शिबिरात ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची निराशा
वाई : शिधापत्रिकेतील नावे वाढविणे किंवा कमी करणे, नवीन शिधापत्रिका, जुने व दुबार शिधापत्रिका बदलून देणे, यासाठी वाई तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने आज (गुरुवारी) शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांची झुंबड उडाली. मात्र ग्रामविकास अधिकाऱ्यांचा संप असल्याने नागरिकांच्या पदरी निराशा आली.
वाई तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने तालुक्यातील नागरिकांच्या शिधापत्रिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बाजार समितीच्या कार्यालयात शिबिर आयोजित केले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आले होते. त्यांच्या गाड्यांमुळे बाजार समितीत काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यातच ग्रामविकास अधिकाऱ्यांचा संप असल्याने घराचे उतारे, दाखले मिळाले नाहीत.
यामुळे नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन शिबिराचा कालावधी वाढवावा, तसेच ही शिबिरे मंडलनिहाय घेण्यात यावीत, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. दिवसभरात जवळपास सात हजार अर्ज विकले गेले. एका दिवसात तीन हजार लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांचा जर संप नसता तर कदाचित एका दिवसात सर्वाधिक नागरिकांचे प्रश्न निकाली काढला.(प्रतिनिधी)