Satara: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सात वाघांचा वावर, वन्यजीवांवर २४६ कॅमेऱ्यांचा वॉच

By संजय पाटील | Published: December 25, 2023 12:11 PM2023-12-25T12:11:10+5:302023-12-25T12:36:18+5:30

वाघ पाचवेळा कॅमेऱ्यात कैद

Seven tigers roam in Sahyadri Tiger Reserve, 246 cameras watch wildlife | Satara: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सात वाघांचा वावर, वन्यजीवांवर २४६ कॅमेऱ्यांचा वॉच

Satara: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सात वाघांचा वावर, वन्यजीवांवर २४६ कॅमेऱ्यांचा वॉच

संजय पाटील

कऱ्हाड : ‘सह्याद्री’च्या अधिवासात शेकडो प्रजातीचे हजारो प्राणी वावरत असताना या प्राण्यांच्या हालचाली पूर्वी पडताळता येत नव्हत्या. अभ्यासकांना वन्यजीवनाचा जवळून अभ्यासही करता येत नव्हता. मात्र, प्रकल्पात कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आल्यामुळे अनेक प्राण्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद होत असून आत्तापर्यंत पाचवेळा या कॅमेऱ्यांमध्ये पट्टेरी वाघ कैद झाला आहे.

दरम्यान, प्रकल्पात आढळलेल्या विष्ठांची ‘डीएनए’ तपासणी आणि कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटोंची पडताळणी केल्यानंतर देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने ‘सह्याद्री’त सात वाघांचे अस्तित्व असल्याचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे वाघांसाठी ‘सह्याद्री’ पोषक असल्याचे स्पष्ट होत आहे.

पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शेकडो प्रजातीचे हजारो प्राणी आढळतात. या प्राण्यांची नोंद ठेवणे सहज शक्य नसल्यामुळे त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी प्रकल्पात २४६ कॅमेरे लावण्यात आले आहेत. २४ तास या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रकल्पातील प्राण्यांची छायाचित्रे घेतली जातात. याच कॅमेऱ्यात पाचवेळा पट्टेरी वाघांची छायाचित्र कैद झाली आहेत. सुमारे १३ वर्षांपूर्वी प्रथमच एका कॅमेऱ्यात वाघ कैद झाला होता.

मात्र, छायाचित्र अस्पष्ट असल्याने वनविभागाला त्याबाबतची खात्री नव्हती. मात्र, त्यानंतर दोन पट्टेरी वाघ एकाचवेळी कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे वाघांचे अस्तित्व असल्याचा ठोस पुरावाच हाती लागला. त्यानंतरही दोनवेळा कॅमेऱ्यात वाघाच्या हालचाली टिपल्या गेल्या आहेत. त्यामुळे ‘सह्याद्री’त वाघांचा वावर वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

वाघ पाचवेळा कॅमेऱ्यात कैद

  • २०१० : पुसटशी छबी. खात्री नाही.
  • २३ मे २०१८ : सायंकाळी ६.३६ वा.
  • २४ मे २०१८ : मध्यरात्री १२.५२ वा.
  • २८ एप्रिल २०२१ : रात्री ११.४० वा.
  • १७ डिसेंबर २०२३ : पहाटे ४.५९ वा.


‘काली’तील वाघ ‘सह्याद्री’त !

सह्याद्री प्रकल्पातील कॅमेऱ्यात मे २०१८ मध्ये एका वाघाची छबी टिपण्यात आली होती. तोच वाघ सह्याद्रीपासून दक्षिणेला सुमारे साडेतीनशे किलोमीटरवर कर्नाटकात असलेल्या काली व्याघ्र प्रकल्पातही आढळून आला होता.

संवर्धन राखीव वनक्षेत्र

  • २२५.२४ : चंदगड
  • २९.५३ : तिलारी
  • ९२.९६ : विशाळगड
  • ५६.९२ : पन्हाळगड
  • ७२.९० : आंबोली
  • ६५.११ : जोर जांभळी
  • ५.३४ : मसाई पठार
  • (सर्व क्षेत्र चौ.कि.मी.मध्ये)


परिभ्रमण मार्गाचे संवर्धन गरजेचे

सह्याद्रीत वाघांचे स्थानांतरण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र, त्यासाठी प्रथम दक्षिणेकडून राधानगरी ते चांदोली या वाघांच्या परिभ्रमण मार्गाचे संवर्धन झाले पाहिजे. त्याचबरोबर तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.

.. असा आहे व्याघ्रप्रकल्प

  • ११६५ : कोअर, बफरसह एकूण क्षेत्र
  • ३१७.६७० : चांदोली राष्ट्रीय उद्यान
  • ४२३.५५० : कोयना वन्यजीव अभयारण्य

प्रकल्पातील कॅमेऱ्यामध्ये टिपले गेलेले वाघ स्थानिक नाहीत. ते उत्तरेतील कोयनेपासून दक्षिणेतील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत वावरत आहेत. देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेच्या विश्लेषणानुसार सह्याद्रीत यापूर्वी सात वाघांचा अधिवास स्पष्ट झाला आहे. वाघांचा हा वाढता वावर निश्चितच आशादायी आहे. - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

Web Title: Seven tigers roam in Sahyadri Tiger Reserve, 246 cameras watch wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.