सातारच्या एकुलत्या एक सिग्लनचे सतराशे साठ नियम.. पोलिसांनाच हवे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:04 AM2017-12-11T11:04:20+5:302017-12-11T11:12:38+5:30
सातारा शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचानक वाहने सोडल्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. या ठिकाणी प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
सातारा : शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचानक वाहने सोडल्यामुळे अपघाताचीही शक्यता असते. या ठिकाणी प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
सातारा शहरात चार ते पाच ठिकाणी सिंग्नल यंत्रणा असली तरी केवळ पोवई नाक्यावरील सिग्नल सध्या सुरू आहे. या सिग्नलला तब्बल सात रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे वाहनांच्या रहदारीचे प्रमाणही जास्त आहे. या सिग्नलवर अलीकडे छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये वाहन चालकांचे जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
वाहतूक समादेशक मधुकर शेंबडे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या सिग्नलवर कशामुळे अपघात होत आहेत, याचे निरीक्षण केले. त्यावेळी अनेक त्रुटी समोर आल्या. वाहन चालकही अपघाताला जबाबदार असल्याचे दिसून आले. सिग्नल सुटण्यापूर्वीच काही वाहनधारक घाई करून सुसाट वाहने घेऊन जात आहेत. मात्र, या ठिकाणी असलेल्या हवालदाराने हाताने पुढे जाण्याचा इशारा करणे गरजेचे असते. मात्र, पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते.
येथील पोलिस केवळ पावती फाडण्यामध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळीत करण्यामध्ये कोणालाही रस नाही. केवळ सिग्नलवर असलेल्या सेकंदावरच पोलिस अवलंबून राहत आहेत. काही पोलिस कर्मचारी सिग्नल संपण्यापूर्वी १५ सेकंद अगोदर तर काही कर्मचारी २० सेकंद अगोदर वाहतूक पुढे जाऊ देण्याचा हाताने इशारा करत आहेत. त्यावेळी विशेष म्हणजे सिग्नल सुरू असतो.
पोलिसच जर वाहतुकीचे नियम मोडत असतील तर नागरिकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
हिरवे दिवे लागेपर्यंत पादचारी रस्ता ओलांडत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. हिरवा दिवा लागल्यानंतरच थांबलेली वाहतूक सोडण्यात यावी. अशी मागणीही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
शासन, जनता, चालक, पादचारी यांच्या हितार्थ व सुरक्षिततेसाठी सिग्नलवरील नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे.
-मधुकर शेंबडे (वाहतूक समादेशक)