सातबारा दुरुस्ती... अजून जरा थांबा, अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना उत्तरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:47 AM2019-03-30T11:47:41+5:302019-03-30T11:52:31+5:30
खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तहसील प्रशासनाबाबत उदासिनता निर्र्माण होत आहे.
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तहसील प्रशासनाबाबत उदासिनता निर्र्माण होत आहे.
खटाव तालुक्यातील चोराडे, वडगाव, निमसोड म्हासुर्णे, गोरेगाव (वांगी), रहाटणी, शेनवडी, कळंबी येथील शेतकऱ्यांना सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज व आॅनलाईन सातबारा काढण्यास वडूज तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
आॅनलाईन सातबारा दुरुस्तीसाठी १५५ चा अर्ज व नवीन रेशनकार्ड काढण्यास दिलेल्या अर्जदारांनी किती दिवस वडूजवारी करायची, याचा विचार अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत असून, याबाबत वडूज तहसीलदार लक्ष घालणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
त्याचबरोबर सातबारा काढणारे सर्व्हर डाऊन तर कधी नेट बंद, अधिकारी असे कारणे देऊन, याचे आज काम होणार नाही. दोन दिवसांनी या, असे सांगून शेतकऱ्यांना माघारी पाठवले जात आहे. तसेच दोन दिवसांनी आल्यावर त्याच पद्धतीने उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुसतीच मोकळी वडूजवारी करावी लागत आहे.
सध्या शासनाने आॅनलाईन सातबारा उतारा असल्याशिवाय कोणताही जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, वारस नोंदी, हक्कसोडपत्र, बँकबोजा, सातबारा दुरुस्ती आदी कामांसाठी आॅनलाईन सातबारा आवश्यक केले. त्यातच आता मार्च एंड चालू असून, सातबाऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा त्यांच्या दुरुस्ती करण्यास अमाप खर्च येत आहे.
तसेच तलाठ्यांनी आॅनलाईन उतारे करताना अनेक चुका केल्यामुळे सातबारा दुरुस्तीसाठी तहसीलदारांना अर्ज करावे लागत असल्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत. तरी याकडे गांभीर्याने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वडूजला मोकळे हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र दिसत आहेत.
वडूज तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही आॅनलाईन सातबारा उताऱ्यांची दुरुस्ती केली जात नाही. आॅनलाईन सातबारा भरताना संबंधित अधिकाऱ्यांकंडून चुका झालेल्या आहेत. ही दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना १५५ चा अर्ज तहसीलदाराच्या नावे द्यावा लागत आहे. तरी ही पद्धत बंद करून तलाठ्यांना अधिकार देऊन सातबारा उतारे दुरुस्त करून दिले पाहिजेत.