कोयना धरणातून ७० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 01:30 PM2019-09-08T13:30:32+5:302019-09-08T13:32:26+5:30
पश्चिम भागात सतत पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.
सातारा: पश्चिम भागात सतत पाऊस सुरू असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे सुरूच असून रविवारी दुपारच्या सुमारास ७० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता.
तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागात भागात अॅागस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पाटण, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडे हाहाकार उडाला होता. रस्त्यावर झाडे आणि दरडी पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला. घरात पाणी घुसलेले, शेती, पिकांचे मोठे नुकसान झालेले. तर पश्चिमेकडील सर्वच धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने कोयना, कृष्णा आणि नीरा नदीला महापूर आलेला. सतत आठ दिवस नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला घोर लागलेला. तर अनेकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलेले. ही परिस्थिती निवळल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागात सतत पाऊस कोसळत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरला जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना धरणात रविवारी दुपारी बारा वाजता १०३.६२ टीएमसी पाणीसाठा होता. तर कोयनेत ७० हजार ४०४ क्यूसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी तेवढाच विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. तर धरणाचे दरवाजे आठ फुटांपर्यंत वरती घेण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून धरणातून पाणी सोडल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदी पात्रातील पाण्यात वाढ झाली आहे.