सातारा : कोयना प्रकल्पाच्या अनेक वाहनांचा खुळखुळा, सहा वाहने बंद स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:45 PM2018-11-07T12:45:54+5:302018-11-07T12:49:32+5:30
कोयना जलसिंचन विभागाकडील अकरा वाहनांपैकी सहा वाहने पूर्ण बंद अवस्थेत आहेत. या वाहनांअभावी चालकांना काम करावे लागत आहेत.
कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना नदीवरील धरण व जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राच्या पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. येथील जलसिंचन विभागाच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वाहनांची आवश्यकता असते. मात्र, कोयना जलसिंचन विभागाकडील अकरा वाहनांपैकी सहा वाहने पूर्ण बंद अवस्थेत आहेत. या वाहनांअभावी चालकांना काम करावे लागत आहेत.
विद्युतनिर्मित व पाणीसाठ्यासाठी महाराष्ट्रात कोयना प्रकल्प अग्रेसर आहे. या प्रकल्पातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वाहनांच्या कमतरतेने व नादुरुस्तीमुळे प्रकल्पाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी व इतर ठिकाणी कामानिमित्त जाताना गैरसोय होत आहे. तरी शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या सोयी-सुविधा व देखभालीकडे लक्ष द्यावे लागते.
सुमारे १०५.२५ टीएमसी एवढ्या मोठ्या क्षमतेने पाणीसाठा असणारा कोयना प्रकल्प महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र राज्यांसाठी वरदान ठरलेला आहे. परंतु हा प्रकल्प देखभाल दुरुस्ती व सोयी सुविधेअभावी दुर्लक्षित होत आहे. कोयनानगरला धरणाची निर्मिती झाल्यानंतर १९६७ मध्ये भूकंपाच्या धक्क्याने हादरलेल्या प्रकल्पाने काही वर्षांत उभारी घेतली.
कोयना भाग निसर्गाने बहारलेला आहे. तसा कोयना धरण विविध कार्यालये व जलविद्युत प्रकल्पामुळे कोयना नगरी व परिसर समृद्ध झाला होता. परंतु गत काही वर्षांपासून कोयना प्रकल्पाला ग्रहण लागले असून, कोयनेतील अनेक शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली तर येथे सुरू असणारी प्रकल्पातील अनेक कामे ठप्प झाली.
नेहरू गार्डन, पॅगोडा, विश्रामगृह आदींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कोयनाप्रकल्पासह कोयना बकाल व ओसाड झाली आहे. या प्रकल्पाने राज्याला खूप दिले. मात्र, त्याबदल्यात या प्रकल्पाला व प्रकल्पग्रस्तांना शासन व प्रशासन पातळीवर दखल घेतली गेली नाही.