माणुसकी हरवली!, कडाक्याच्या थंडीत वृद्धाला कारमधून आणून सिव्हिलसमोर सोडलं, साताऱ्यातील प्रकार
By दत्ता यादव | Published: January 17, 2024 02:03 PM2024-01-17T14:03:08+5:302024-01-17T14:04:02+5:30
पाच दिवस रस्त्याच्याकडेला थंडीत मुक्काम
सातारा : अलीकडच्या पिढीला घरातील वृद्ध अडसर वाटू लागले आहेत. वृद्धत्व तसेच आजारपणामुळे अंथरुणावर खिळून असलेल्या वृद्धांना घराबाहेर काढले जात आहे. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला असून, एका सत्तर वर्षांच्या आजोबांना कारमधून आणून सिव्हिलसमोर सोडलं गेलं. ना त्यांना बोलता येते ना चालता येते. तब्बल पाच दिवस ऐन थंडीत त्यांनी पाच रात्री रस्त्यावर घालविल्या. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सातारकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोरील रस्त्याच्याकडेला एक सत्तर वर्षीय आजोबा विव्हळत पडले होते. काही नागरिकांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बोलता येत नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी सिव्हिल परिसरातील काही लोकांना या आजोबांबद्दल काही माहिती आहे का, हे विचारले असता काही लोकांनी सांगितले, या आजोबांना पाच दिवसांपूर्वी एका कारमधून आणून या ठिकाणी सोडण्यात आलं आहे. रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
संबंधित कारचा नंबरही कोणी पाहिला नाही. त्यामुळे आजोबांना या ठिकाणी सोडणारे नेमके कोण होते, हे समोर आले नाही. थंडीमुळे आजोबा कुडकुडत असल्यामुळे काही लोकांनी त्यांना जेवणही दिले. तसेच त्यांच्या अंगावर चादर टाकली. तेव्हा कुठे त्यांना ऊब आली.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन आजोबांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्या आजोबांना वेळे येथील माझ्या निवारा केंद्रात नेले जाणार असल्याचे रवी बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आजोबांना बऱ्याच व्याधी..
त्या आजोबांना बोलता, उठता आणि बसताही येत नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन संबंधितांनी आजोबांना या ठिकाणी आणून सोडलं, असल्याचं बोललं जातंय. त्यांना बऱ्याच व्याधी असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे मोठे आव्हान असणार आहे.
आजोबांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांचा शोध घ्या..
आजोबांना ऐन थंडीत पाच रात्री रस्त्यावर काढाव्या लागल्या. ज्या कोणी त्यांना असे वाऱ्यावर सोडले आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सातारकरांमधून होऊ लागली आहे.