पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली, सातारकरांचा टॅंकरची वाट बघण्यात जातो दिवस

By नितीन काळेल | Published: June 15, 2023 12:30 PM2023-06-15T12:30:06+5:302023-06-15T12:30:20+5:30

माण तालुक्यात तर भीषणता अधिक

Severe water shortage in Satara, Citizens spend their days waiting for the tanker | पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली, सातारकरांचा टॅंकरची वाट बघण्यात जातो दिवस

पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली, सातारकरांचा टॅंकरची वाट बघण्यात जातो दिवस

googlenewsNext

सातारा : मान्सूनचा पाऊस लांबला.. उन्हाळी पाऊसही कमी झाले.. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता वाढू लागली आहे. माण तालुक्यात तर भीषणता अधिक आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठीही लोक पायपीट करत आहेत. त्यातच टॅंकरने पाणीपुरवठा होत असलातरी अपुरा आहे. तर टॅंकरची वाट पाहण्यामुळे पै-पाहुणेही दुरावले असून पशुधनाची तर पाण्याअभावी परवड सुरू असल्याचे वास्तव समारे येत आहे.

जिल्ह्यात मागील चार वर्षांत टंचाई जाणवली नव्हती. याला कारण जलसंधारणाची कामे. त्यातच पाऊसही वेळेत सुरु व्हायचा. वळीवही बरसून धरणीमाता तृप्त करायचा. पण, यंदा हवामान विभागाचा अंदाज खरा होताना दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणार असून सध्यातर मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत सतत वाढ होत चालली आहे. जून मध्यावर आलातरी लोकांची तहान भागविण्यासाठी टॅंकर धुरळा उडवत पळत आहे.

सध्यस्थितीत जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा सोडले तर ९ तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये माणमध्ये तर उन्हाच्या चटक्याबरोबरच पाणीटंचाईची दाहकता लोकांना गलबलून सोडत आहे. यामुळे प्रशासन टॅंकर सुरू करत असलेतरी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे लोकांना विकतही पाणी घेण्याची वेळ आली आहे.

माणमध्ये टंचाईची स्थिती भयानाक आहे. २८ गावे आणि १६१ वाड्यांना टॅंकरचाच आधार आहे. तालुक्याच्या चाैफेर भागात टंचाई आहे. सध्या २० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असलातरी यापुढे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. या टंचाईग्रस्त गावांत माणसी आणि जनावरांच्या संख्येप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. भाटकी गावातही गेल्या १५ दिवसांपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. पण, पाणी कमी पडत आहे. त्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

या गावातील लोकांना पाणी देताना सार्वजनिक विहिरीत टॅंकरचे पाणी सोडले जाते. त्यानंतर नळाद्वारे पाणी मिळते. पण, हे पाणी चार दिवसांतून एकदा येते. तर वाड्यांसाठी टॅंकर जागेवर जात असलातरी दिवसभर लोकांना वाट पहावी लागते. त्यामुळे कधी टॅंकर येतोय याची वाट पाहण्याने पाहुणे तसेच एखाद्या कामासाठीही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. भाटकीप्रमाणे माण तालुक्यातील अनेक गावांची स्थिती अशी झाली आहे. यासाठी प्रशासनाने वेगाने उपाययोजना राबवाव्यात अशीच मागणी होत आहे.

सध्या माणसांना आणि जनावरांसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण, हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जनावरांनाही चारा सोलापूर जिल्ह्यातून आणवा लागतोय. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या लवकर सुरू कराव्यात अशी आमची विनंती आहे. - दत्तात्रय शिर्के, सामाजिक कार्यकर्ते भाटकी, ता. माण

Web Title: Severe water shortage in Satara, Citizens spend their days waiting for the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.