भुयारी गटार योजनेच्या कामाने रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:23+5:302021-03-10T04:38:23+5:30
फलटण : फलटण शहरात भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. रस्ते खोदल्यामुळे सर्वत्र धूळ उडत असून जनता ...
फलटण : फलटण शहरात भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. रस्ते खोदल्यामुळे सर्वत्र धूळ उडत असून जनता धुळीमुळे त्रस्त झाली आहे. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनीही चुप्पी साधल्याने जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे.
फलटणमध्ये दोन ते तीन वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असून एकाच ठिकाणचे काम व्यवस्थित पूर्ण न करता पूर्ण फलटण शहरात अनेक ठिकाणी त्यांनी कामे सुरू केली आहेत. कामे सुरू करताना खड्डे खोदून पाइपलाइन टाकली आहे. त्यावर विटांचा थर देऊन चेंबरचे बांधकाम केलेले आहे. मोठमोठे खड्डे मातीने बुजवले असून त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे बुजवलेल्या खड्ड्यांवरून वाहने जाऊन पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत.
डांबरीकरण न झाल्याने सर्वत्र धूळ उडत आहे. गल्लीबोळातून सुरू असलेल्या कामामुळे धुळीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. भाजीपाला विक्रेते दुकानदार त्रस्त झाले आहेतच, पण घरातही धूळ घुसत असल्याने महिलाही त्रस्त झालेल्या आहेत. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी खड्डे तसेच पॅचवर्किंग न करता मातीचा थर दिल्याने वाहने येऊन जाऊन तेथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. भुयारी गटार योजनेचे काम कधी पूर्ण होणार याबाबत निश्चित माहिती नगरपालिकेकडून मिळत नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर निघत आहे. अनेक भागांत झालेल्या कामावरच पुन्हा खोदकाम करून खड्डे पडल्याने अनेकांची नळाची पाइपलाइन तुटणे, गटारी फुटत आहेत. याचा नागरिकांनाच भुर्दंड बसत आहे. भुयारी गटार योजनेचे काम सुरू असताना व्यवस्थित खड्डे बुजवणे, धूळ न उडणे, पॅचवर्कबाबत सत्ताधारी असो किंवा विरोधी नगरसेवक असो सर्वांनी चुप्पी साधलेली आहे.
चौकट
काम बंद पाडण्याचा इशारा
फलटण शहरात भुयारी गटार योजनेची कामे व्यवस्थित न करता अनेक भागांत रस्ते उकरून ठेवले आहेत. तसेच सर्वत्र धूळही उडत असून नागरिकांना नाहक त्रास होत आहे. कामे व्यवस्थित करून खड्डे न बुजविल्यास कामे बंद पाडून फलटण नगरपालिकेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे फलटण तालुकाप्रमुख स्वप्नील मुळीक यांनी दिला आहे.
चौकट
भुयारी गटार योजनेच्या कामांना गती नसल्याने अनेक महिन्यांपासून रस्ता बंद आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांची येता-जाता खूपच कुचंबणा होत आहे. वाहनेही लांब लावावी लागतात. माती उडून घरात येते, यामुळे लोक वैतागत आहेत.
फोटो ०९फलटण-रोड
फलटण येथील शुक्रवार पेठेतील दत्त मंदिरजवळील रस्ता तीन महिन्यांपासून बंद आहे. (छाया : नसीर शिकलगार)