कऱ्हाडात ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश
By admin | Published: February 20, 2016 12:49 AM2016-02-20T00:49:35+5:302016-02-20T00:49:44+5:30
लॉजवर छापा : पाच परप्रांतीय युवतींसह दलाल ताब्यात
कऱ्हाड : शहरानजीकच्या नवरंग लॉजवर शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. संबंधित लॉजमधून दोन दलाल, पाच ग्राहकांसह पाच परप्रांतीय युवतींना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर परिसरातील काही लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती उपअधीक्षक शिवणकर यांना मिळाली होती. या माहितीनुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना लॉजमधील हालचालींविषयी माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या. त्यातून मलकापुरातील नवरंग लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. उपअधीक्षक शिवणकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक नवरंग लॉजवर छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे लॉजमध्ये धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी शिवाजी महादेव शेट्टी (रा. मलकापूर) याच्यासह दोन दलाल व पाच ग्राहकांना ताब्यात घेतले. तसेच लॉजमधील खोल्यांची झडती घेतली जात असताना पाच परप्रांतीय युवती आढळून आल्या. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
संशयितांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली जात होती. याबाबतचा गुन्हा नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते. (प्रतिनिधी)
लॉजवाल्यांचे धाबे दणाणले
कऱ्हाडसह मलकापूर परिसरात अनेक लॉज आहेत. तसेच कऱ्हाड-पाटण मार्ग व ओगलेवाडी मार्गानजीकही नव्याने काही लॉज उभी राहिली आहेत. यापैकी काही लॉजवर अनधिकृत व्यवसाय चालविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने संबंधित व्यावसायिकांचे फावले होते. शुक्रवारच्या कारवाईमुळे अनेक लॉजवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.