सं‘ग्रामसभा’ मल्हारपेठमध्ये तंटामुक्तीवरुन खडाजंगी

By admin | Published: January 27, 2016 11:05 PM2016-01-27T23:05:21+5:302016-01-28T00:27:48+5:30

दोन गटांमध्ये राडा : दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... मल्हारपेठमध्ये पोलीस बंदोबस्त... खटावमध्ये अनेक विषयांवर चर्चा

SGGS Sabha 'Malharpeeth's Tantamukta from Khadjangi | सं‘ग्रामसभा’ मल्हारपेठमध्ये तंटामुक्तीवरुन खडाजंगी

सं‘ग्रामसभा’ मल्हारपेठमध्ये तंटामुक्तीवरुन खडाजंगी

Next

कुळकजाईच्या सभेत सरपंचाला मारहाण----ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे सभा गाजली

दहिवडी : माण तालुक्यातील कुळकजाईच्या ग्रामसभेत जोरदार राडा झाला. महिला सरपंचांना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात पुन्हा राजकीय वैमनस्य उफाळून आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुळकजाई येथे प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहाच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेसमोर ग्रामसभा सुरू असताना सरपंच मनीषा घाडगे यांना ‘तुम्हाला गावचे कामकाज करता येत नाही,’ असे म्हणत मारहाण करण्यात आली. सरपंच घाडगे यांच्या तक्रारीनुसार विजय गणपत जगताप, किसन गंगाराम शेडगे, अनिल आनंदराव पवार, हणमंत हरी फडतरे, शिवाजी शंकर कापसे, विक्रम गणपत जगताप, अशुतोष सयाजी शिंदे, शंकर भिकू पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, ग्रामसभेदिवशीच सकाळी साडेअकराच्या सुमारास मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन नेण्यात आल्याची तक्रार विजय जगताप यांनी दिली आहे. या तक्रारीवरून वैभव कुमार पोतेकर, कुमार गोविंद पोतेकर, धनाजी भगवान पोतेकर, सुनील अशोक शिंदे, दत्ता अशोक शिंदे, रमेश शंकर शिंदे, संदीप दिनकर शिंदे, तुषार शंकर शिंदे, दत्ता शंकर पोतेकर, केशव सुभाष कदम व सरपंच घाडगे यांच्या भावाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे व हवालदार यशवंत काळे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)

मल्हारपेठ : घरकूल जागेचा वाद, तंटामुक्ती अध्यक्ष बडतर्फ, कचरा कुंड्या व गटार व्यवस्था, पंधरा टक्के अनुदान आदी विविध विषयांवर येथील ग्रामसभेत वादळी चर्चा झाली. येथील ग्रामसचिवालयाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात सरपंच नानासो कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच सूर्यकांत पानस्कर व तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर वादळी चर्चा झाली. यासाठी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर दररोज प्रत्येक वॉर्डमध्ये ट्रॅक्टर फिरवण्यात येईल, असा तोडगा काढण्यात आला. तसेच कुंभार बंधूंच्या घरकूल जागेचा वाद मिटविण्यास पदाधिकारी अकार्यक्षम असल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी ग्रामसभेतील अनेकांनी केली. तंटामुक्ती अध्यक्ष यांना तीन अपत्य असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. तंटामुक्तीचे नवीन अध्यक्ष जयवंत पानस्कर यांची नियुक्ती झाली. (वार्ताहर)


खटाव : प्रजासत्ताकदिनी सरपंच सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खटावच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे ग्रामसभा गाजली. ग्रामविकास अधिकारी एस. एस. कांबळे यांनी विषयांचे वाचन केले. जलयुक्त शिवार योजनेसाठी समिती बनविणे व त्या कामामध्ये येत असलेल्या विविध घटकांवर चर्चा झाली. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक शिवार परिसरातून पाच शेतकऱ्यांची नावे घेऊन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम, सहा किलोमीटर लांबीचे नदीपात्रातील रुंदीकरण, खोलीकरणाची कामे लोकसहभागातून पूर्ण करून नदीला पुनरुज्जीवन देण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा २0१६-१७ चा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करणे तसेच लेबर बजेटला मान्यता घेण्यात आली. वित्त आयोगातील कामांचा आराखडा तयार करण्यात आला. वर्षभर करवसुली थांबल्यामुळे गावात विविध अडचणी व समस्या निर्माण झाल्या होत्या. ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या कराव्यतिरिक्त कोणतीच आर्थिक तरतूद नसल्यामुळे गेल्या वर्षभरात विकास कामाची गती कमी झाली होती. परंतु नवीन प्रचलित घरफाळा वसुलीच्या अद्यादेशामुळे आता पुन्हा करवसुली सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षभरात बरेच प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास ग्रामविकास अधिकारी एस. एस. कांबळे यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)

Web Title: SGGS Sabha 'Malharpeeth's Tantamukta from Khadjangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.