वटवृक्षांच्या छायेत नांदते ‘वडाचे म्हसवे’
By Admin | Published: March 25, 2015 12:32 AM2015-03-25T00:32:04+5:302015-03-25T00:40:27+5:30
गावाला ऐतिहासिक किनार : आशिया खंडातील सर्वात महाकाय वडाचे झाड
दत्तात्रय पवार - कुडाळ वैराटगडाच्या पायथ्याशी वसलेले म्हसवे हे गाव आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आपली सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपत आहे. गावात आशिया खंडातील सर्वांत विशाल असे वडाचे झाड आहे. या झाडापासून अनेक वडाची झाडे येथे विस्तारलेली पाहायला मिळतात. गावात प्रवेश करताच उजव्या बाजूला वडांची झाडे दृष्टीस पडतात. त्यामुळे जावळीतील म्हसवे हे गाव ‘वडाचे म्हसवे’ म्हणून ओळखले जाते. तर शिवकालीन ओळख जपणाऱ्या या गावातील वडांची नोंद ब्रिटिशांच्या दप्तरी आजही पाहायला मिळते.
पाचवड-कुडाळ राज्यमार्गावर असणाऱ्या वडाचे म्हसवे गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचे म्हणून या गावाची तालुक्यात ओळख आहे. वैराटगडाच्या पायथ्याशी वसल्यामुळे शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीचा, पराक्रमाचा इतिहास गावाने पाहिला आहे. तर पाच पांडव वनवासात भटकंती करीत असताना वाईच्या विराटराजाच्या पदरी आले होते. त्यावेळी ते गाई-गुरे चारण्यासाठी वैराटगडावर व म्हसवे परिसरात फिरत होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. यामुळे गावाला एक वेगळी ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. गावात पुरातन जननीदेवीचे मंदिर आहे.
ब्रिटिश राजवटीत एका अधिकाऱ्याने वडाचे म्हसवे गावाला भेट दिली. त्यावेळी तो येथील महाकाय वडाचे झाड पाहून आश्चर्यचकित झाला. येथील नयनरम्य परिसर पाहून येथे काही दिवस वास्तव्य केले व विशाल वटवृक्ष तसेच वन्यजीवांचा अभ्यास केला. आजही त्याने आपल्या शब्दांत या वडाचे जे वर्णन केले आहेत ते ब्रिटिश नोंदवहीत पाहायला मिळते.
शासनाने दुर्मिळ होत चाललेल्या वडांचे संवर्धन केल्यास गावच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा वडाचे म्हसवे ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
विशाल
झाडांचे गाव
वडाचे म्हसवे गावात पाच एकर परिसरात महाकाय वड पसरलेला आहे. या वडाने अनेक वडांना जन्म दिला आहे. याठिकाणी सध्या ३० ते ४० महाकाय वटवृक्ष आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी असणाऱ्या वडांच्या झाडांमुळे एक ‘वडांचं गाव’ वसल्याप्रमाणे हे दृश्य दिसते. वृक्षपे्रमी हे वैभव पाहण्यासाठी, अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात गावाला भेटी देतात. जागतिक वनदिनानिमित्त वनविभागाकडून येथे विविध कार्यक्रम होतात.